अर्शदीप सिंगला का ठेवतात वारंवार संघाबाहेर? बॉलिंग कोचने सांगितलं खरं कारण
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा, डेथ ओव्हर्समध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम करणारा आणि प्रत्येक संधीचे सोने करणारा अर्शदीप सिंग, तरीसुद्धा त्याला वारंवार प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात येते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतही अर्शदीपला अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते.
मात्र, तिसऱ्या सामन्यात जेव्हा त्याला संधी देण्यात आली, तेव्हा अर्शदीपने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दरम्यान, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी स्पष्ट केले आहे की, सतत चांगली कामगिरी करूनही अर्शदीपवर वारंवार कुठे गाज का येते.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी मॉर्नी मॉर्केल पत्रकार परिषदेत आले आणि अर्शदीपसोबत होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले, “अर्शदीप हा एक अनुभवी गोलंदाज आहे. आम्ही मोठ्या चित्राकडे पाहून संघ संयोजनाच्या विविध शक्यता आजमावत आहोत, हे त्याला चांगलेच माहीत आहे.”
अर्शदीप हा एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे आणि त्याने पॉवरप्लेमध्ये आमच्यासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे त्याची किंमत आणि महत्त्व आम्हाला पूर्णपणे माहित आहे. मात्र, या दौऱ्यात इतर संघ संयोजनांचा विचार करणेही आमच्यासाठी गरजेचे आहे आणि अर्शदीपलाही ही गोष्ट पूर्णपणे समजते.
सध्या अर्शदीप टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. अर्शदीपने ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस आणि मार्कस स्टॉइनिस यांची महत्त्वाची विकेट घेत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला. भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या 66 सामन्यांमध्ये अर्शदीपने 104 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियासाठी या फॉरमॅटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेणारा अर्शदीप हा एकमेव गोलंदाज आहे.
Comments are closed.