कर्माचे फळ त्वरित मिळते… बेन स्टोक्सबाबत आर. अश्विनने असं का म्हटलं?
मँचेस्टर येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अशा प्रकारच्या दुखापतींसाठी रिप्लेसमेंट खेळाडू मिळायला हवेत, अशी मागणी केली होती. परंतु इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ही मागणी फेटाळून लावत तिला “मजाक व बेतुकी” संज्ञा दिली होती.
मात्र, अखेरच्या कसोटीत इंग्लंडचा प्रमुख खेळाडू क्रिस वोक्स दुखापतग्रस्त झाल्यानंतर हा वाद पुन्हा पेटला. यावर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने स्टोक्सवर जोरदार टीका केली. आपल्या यूट्यूब चॅनेलवर अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे विश्लेषण करताना अश्विन म्हणाला, “एक तमिळ म्हण आहे, तुमच्या कर्मांचे फळ तुम्हाला जवळजवळ त्वरित मिळते. जे पेराल तेच उगवेल. पंतच्या दुखापतीवर जेव्हा स्टोक्सला विचारण्यात आले, तेव्हा त्याने मजाक आणि बेतुका असे शब्द वापरले. मी स्टोक्सचा मोठा चाहता आहे, पण उत्तर देताना त्याने विचारपूर्वक बोलायला हवे होते.”
क्रिस वोक्सच्या जिद्दीची स्तुती करत अश्विन म्हणाला, “वोक्स जखमी खांदा स्वेटरमध्ये दाबून मैदानात उतरला आणि आपल्या संघासाठी जीव ओतून खेळला. त्याने एटकिंसनला स्ट्राइक देऊन सामन्याला जिंकण्याच्या टप्प्यापर्यंत नेले. त्याला माझा सलाम. ही केवळ वृत्ती नव्हे, तर संघासाठी झटण्याची प्रेरणादायी पद्धत होती.”
अश्विनने पुढे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या विधानाचा संदर्भ देत नियमांमध्ये बदलाची गरज असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “वॉन यांनी आधीच म्हटले होते की, हा खेळाचा असा भाग आहे जिथे बदल होणे गरजेचे आहे. दुखापतींसाठी रिप्लेसमेंटची परवानगी असायला हवी. दुसऱ्या संघाबद्दल सहानुभूती दाखवणे महत्त्वाचे आहे. जर पंतसारखा खेळाडू त्यांच्या संघात असता आणि दुखापत झाली असती, तर काय? खेळाडू बदलायला नको का? मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण मजाक आणि बेतुका असे शब्द वापरणे योग्य नाही. बोलण्याआधी विचार करा – कारण कर्म त्वरित फळ देते.”
Comments are closed.