आरसीबीने मोहम्मद सिराजला रिलीज का केलं? टीम डायरेक्टरचा धक्कादायक खुलासा
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यंदा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला. याआधी तो तब्बल सात हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा भाग होता. पण ऑक्शनपूर्वी आरसीबीने त्याला रिलीज केले होते. एवढंच नाही, तर ऑक्शनदरम्यान सिराजला पुन्हा घेण्यासाठीही फारशी आक्रमकता दाखवली नव्हती. आता संघाचे डायरेक्टर मो बोबाट यांनी या मागचं कारण स्पष्ट केलं आहे.
आरसीबीचे टीम डायरेक्टर मो बोबाट यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, जर त्यांनी मोहम्मद सिराजला रिटेन केले असते तर भुवनेश्वर कुमारला संघात घेणे कठीण झाले असते. आरसीबीने भुवनेश्वरला 10.75 कोटी रुपयांत विकत घेतले. भुवनेश्वर याआधी सलग 11 हंगाम सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता. यंदा मात्र त्याने आरसीबीकडून खेळला.
बोबाट म्हणाले, “मोहम्मद सिराज हा तो खेळाडू होता, ज्याच्याबद्दल आम्ही सर्वाधिक विचार केला होता. भारतीय वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये सहज मिळत नाहीत. रिटेन, रिलीज किंवा RTM (राइट टू मॅच) या सगळ्या पर्यायांवर चर्चा झाली. हे सरळ निर्णय नव्हते. आम्हाला भुवनेश्वरला दोन्ही टोकांवर बॉलिंग करायला हवा होता. सिराजला ठेवले असते तर हे शक्य झाले नसते. त्यामुळे अनेक घटक विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा लागला.”
सिराजने यंदा गुजरात टायटन्सकडून 15 सामन्यांत 16 विकेट्स घेतल्या. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट 9.24 इतका होता. आरसीबीसाठी खेळताना सिराजने 7 हंगामांत 87 सामने खेळले आणि 99 बळी घेतले.
आरसीबीचे डायरेक्टर यांनी हेही उघड केले की, कॅमरून ग्रीनला केवळ दुखापतीमुळे रिटेन करण्यात आले नाही. जर तो फिट असता तर त्याला नक्कीच संघात ठेवले गेले असते.
अखेर आरसीबीची रणनीती यशस्वी ठरली आणि तब्बल 18 वर्षांनंतर त्यांनी आपला पहिला आयपीएल किताब जिंकला. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबवर मात केली. विराट कोहली हा आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 15 डावांत 657 धावा केल्या. गोलंदाजीत जोश हेजलवूडने बाजी मारली; त्याने 12 डावांत सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.