Health Tips: पालक-पनीर खाताय? आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणून धक्काच बसेल

आपल्या रोजच्या आहारात पनीर हा एक पोषक आणि चविष्ट पदार्थ मानला जातो. तसंच पालकसुद्धा शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या हिरव्या पालेभाज्यांपैकी एक. यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पालक आणि पनीर यांचे कॉम्बिनेशन म्हणजे आरोग्यदायी डिश, असा समज अनेकांचा असतो. विशेषतः “पालक पनीर” हे डिश अनेक घरांमध्ये लोकप्रिय आहे. (why spinach paneer together is bad for health)

मात्र, अलीकडील संशोधन आणि आहारतज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार पालक आणि पनीर एकत्र खाणं शरीरासाठी फायदेशीर नसून हानिकारक ठरू शकतं.

पनीरमध्ये कॅल्शियम, पालकमध्ये लोह पण एकत्र खाणं चुकीचं का?
आहारतज्ज्ञ सांगतात की, पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, तर पालकामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही घटकांची शरीराला गरज असली तरी ते एकत्र खाल्ल्यास एकमेकांमध्ये अडथळा ठरतात. कारण शरीर एकाच वेळी लोह आणि कॅल्शियम शोषू शकत नाही. याचा परिणाम असा होतो की दोन्ही घटक शरीरात योग्य प्रमाणात शोषले जात नाहीत आणि फायदेशीर ठरण्याऐवजी पचनाच्या समस्या निर्माण करतात.

पचनसंस्थेवर होणारा परिणाम
पालक-पनीर हे डिश खाल्ल्यावर काही लोकांना अॅसिडिटी, गॅसेस, डायरिया किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांचा अनुभव येतो. कारण कॅल्शियम आणि लोहाचे एकत्रित सेवन केल्यावर पचनसंस्था त्यावर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.

शरीरातील लोह शोषणावर परिणाम
शरीरात लोहाची कमतरता झाली, तर हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते, थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो. पालक खाणं फायद्याचं असलं तरी जर त्यासोबत पनीर सारखा कॅल्शियमयुक्त घटक घेतला, तर लोह योग्य पद्धतीने शोषले जात नाही. विशेषतः ज्या व्यक्तींना आयर्न डिफिशियन्सी आहे, त्यांनी हे कॉम्बिनेशन टाळावं.

किडनी स्टोनचा धोका वाढतो
हे फारसं कुणाला माहीत नसेल, पण पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते, जे पनीरमधील कॅल्शियमसोबत प्रतिक्रिया देऊन कॅल्शियम ऑक्सॅलेट क्रिस्टल्स तयार करू शकते. हे क्रिस्टल्स म्हणजेच किडनी स्टोनचे मुख्य कारण ठरतात. ज्यांना मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) तक्रारी आहेत, त्यांनी हे कॉम्बिनेशन टाळावं.

“पालक पनीर” ही भाजी चवदार आणि लोकप्रिय असली, तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ती नेहमी खाणं टाळणं योग्य ठरेल. पनीर आणि पालक दोघेही वेगवेगळ्या वेळेला खाल्ले, तर त्यांचे फायदे शरीराला जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकतात. जेवणात पोषण असावं लागतं, पण ते योग्य पद्धतीनं दिलं गेलं, तरच शरीरासाठी उपयुक्त ठरतं.

Comments are closed.