साई सुदर्शन तिसऱ्या दिवशी फील्डिंगसाठी मैदानात का नाही उतरला? BCCI कडून मोठी अपडेट समोर
भारताचा डाव्या हाताचा फलंदाज साई सुदर्शन (Sai surdarshan) वेस्ट इंडिजविरुद्ध अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फील्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. दुसऱ्या दिवशी फॉरवर्ड शॉर्ट-लेगवर फील्डिंग करताना त्याने रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) चेंडूवर जॉन कॅम्पबेलला कॅच केला, पण वेस्ट इंडिजच्या सलामी फलंदाजाचा मोठा शॉट त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलवर लागल्याने चेंडू त्याच्या हातात अडकला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून सुदर्शन तिसऱ्या दिवशी मैदानावर आला नाही.
बीसीसीआयने (BCCI) रविवारी सुदर्शनच्या दुखापतीबाबत अपडेट दिली. निवेदनात म्हटले आहे की, साई सुदर्शनला दुसऱ्या दिवशी कॅच घेण्याचा प्रयत्न करताना दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नाही, तो ठीक आहे, आणि बीसीसीआयची मेडिकल टीम त्याचे निरीक्षण करत आहे. दुखापतीनंतर सुदर्शन लगेच उपचारासाठी मैदानाबाहेर गेला आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या फील्डिंगमध्ये सहभागी झाला नाही. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलने (Devdatta padikal) फॉरवर्ड शॉर्ट-लेगवर फील्डिंग केली. सुदर्शनने पहिल्या डावात 165 चेंडूंवर 87 धावा केल्या, ज्यात 12 चौकार सामील होते.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 518/5 वर डाव घोषित केला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) 175 धावांवर बाद झाला, तर कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) 129 धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 2 विकेट गमावून 173 धावा केल्या आहेत आणि डाव पराभव टाळण्यासाठी अजून 97 धावा कराव्या लागणार आहेत. जॉन कॅम्पबेल (87) आणि शाई होप (66) यांनी अर्धशतकं करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. चौथ्या दिवशी सामना सुरू झाल्यावर त्यांचा मुख्य उद्देश डावात पराभव टाळणे असेल.
Comments are closed.