मनाचे आरोग्य – जगणं व्हावं सुंदर…
>> आशिष निनगुरकर
बहुसंख्य लोक आपली ओळख करून देताना आपण जगण्यासाठी काय करतो, हे सांगतात. जगणं सुंदर करण्यासाठी काय करतो, हे सांगत नाहीत. किंबहुना, हे असंच सांगावं असा सामाजिक संकेत आहे. `घर’ सांभाळणाऱ्या स्त्रीसाठी तर याचं उत्तर शोधणं हा स्वतला शोधणारा सुंदर प्रवास ठरावा.
आपली स्वतःची ओळख काय ? हा प्रश्न मस्तकात भिरभिरतो तेव्हा एकेक गोष्टी फेर धरत डोळ्यांसमोरून जाऊ लागतात. आपल्या सर्वच गोष्टींमध्ये जीवन जगण्याची व तेही परिपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा आहे. आज आपण ज्या विचित्र मानसिकतेमधून, अवस्थेमधून जात आहोत त्याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत. ही अवस्था केवळ बाह्य, भौतिक दुःखापुरतीच मर्यादित नाही, तर समुदायातील, घराघरांतील कलह, सततचा मानसिक ताण, जीवघेण्या व्यावसायिक स्पर्धेचा दबाव, कधी भावनातिरेक तर कधी भावनाशून्यता अशी टोकाची स्थिती आज निर्माण झालेली आहे. यातून आपण गेलो आहोत ते केवळ एकाच गोष्टीमुळे व ती म्हणजे आपण आपली खरी ओळख विसरलो आहोत. आपण `मोकळा श्वास’ घेणेच विसरत चाललो असल्यानेच आपल्याला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच वेळी आपण आनंद शोधतो तो एखाद्या वस्तूत, व्यक्तीत अथवा परिस्थितीत, पण तो तेथे नसून तो तर दडला आहे तुमच्या मनात. जेव्हा आपण `मोकळा श्वास’ घेतो तेव्हा आपले मनही निर्मळ होते आणि ते छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहते.
आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. आपण स्वत:ला सुशिक्षित समजतो. आधुनिकता आपल्या राहणीतून प्रकट होऊ लागली आहे. पण आपले विश्व, घर मुलं, नवरा व फारच फार तर नोकरीपर्यंत मर्यादित आहे. नोकरी व घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्या आयुष्याची कितीतरी वर्षे पालटत चाललेली आहेत, पण आपली ओळख आधी कुणाची तरी मुलगी, नंतर पत्नी व त्यानंतर आई म्हणूनच बहुधा असते या परिचयामुळे किंवा ओळखीमुळे आपला गौरव कमी होतो. आपण मी आहोत असं मुळीचंच म्हणणं नाही, पण या पलीकडे पण जग आहे हे समजायला हवं व त्या जगातला एक महत्त्वपूर्ण हिस्सा आपण व्हायला हवं, ही कळकळ उत्पन्न व्हायला हवी व त्यासाठी पण भरपूर प्रयत्न केले गेले पाहिजे. स्त्री घरगुती नसून काम करणारी असली, अगदी डॉक्टर, इंजिनीअर, प्रोफेसर, बँकेत काम करणारी असली तरी तिचे ज्ञान, माहिती फक्त तिच्या क्षेत्रापर्यंतच राहते व तिचा बहुमुखी विकास होत नाही. आपल्याला काय करायचं, त्यावाचून कुठे अडतं, नवरा किंवा मुलगा बघेल या भावनेमुळे आपण इतर क्षेत्रांत माघार घेत जातो व वेळेचा अभाव या कारणाखाली स्वत:ची सोडवणूक करत असतो. आज जर आपण खऱ्या अर्थात स्त्री स्वातंत्र्याची अपेक्षा करतो, बरोबरीचे हक्क मिळावेत यासाठी धडपडत असतो, आपल्याला घरात व इतर क्षेत्रांत प्राथमिकता मिळावी ही इच्छा बाळगतो, घरातल्या प्रत्येक निर्णयात आपली भागीदारी असावी असं आपल्याला वाटतं, तर आपल्याला आपली श्रेष्ठता प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करायलाच हवी. आपल्या ज्ञानाचं भंडार प्रत्येक क्षेत्रातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून वाढवायलाच हवं. मग आपोआपच आपलं महत्त्व वाढेल व आपल्या निर्णयांना मान्यता मिळेल. सर्वप्रथम आपण सासू-सुनांच्या निरर्थक, अविश्वसनीय व अतिरेकाने एक दुसऱ्याबद्दल कटुता निर्माण करणाऱ्या सीरियलचा मोह बाजूला करून न्यूज चॅनल्स, डिस्कव्हरी व जिओग्राफी चॅनल्सची बटणं आपल्या रिमोटने उघडली तर ज्ञानाच्या अद्भुत संसाराशी आपली ओळख होऊन त्यात पण खूप आनंददायक असं आहे त्याची जाणीव होईल.
स्वतःची वेगळी ओळख जाणून जेव्हा तुमचं वागणं तुमच्या ठाम मतांवर आधारित असेल तेव्हा इतरांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. म्हणजे तुम्ही तुमची ओळख टिकवून ठेवता. आपली ओळख काय आहे हे जेव्हा तुम्हाला पक्कं माहीत असतं तेव्हा तुम्ही जणू एका झाडासारखे असता, ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतात आणि ते खूप मोठ्या वादळातदेखील टिकून राहतं. स्त्रियांसाठी कधी कधी अवघड प्रश्न येतो, “आपण काय करता?” हो, अवघडच! कारण सर्वसाधारणपणे “आपण काय करता?” म्हणजे “तुम्ही नोकरी किंवा इतर उद्योग करता का?” असं लोकांना विचारायचं असतं. त्यात कला, छंद, पॅशन्स यांचा अंतर्भाव अपेक्षित नसतोच. एखादी बँकेत नोकरी करणारी अफलातून सुगरण असू शकते, तर एखादी गृहिणी कुशल फोटोग्राफर असू शकते, अत्यंत संवेदनशील कविता लिहिणारी असू शकते. कला, छंद, पॅशन्स हे मात्र आपलं आणि आपल्या भवतालचं जगणं सुंदर बनवण्यासाठी केलं जातं!
आपल्याला लोक ओळखतात ही आपली ओळख असतेच. त्यापलीकडे आपण आपल्याला किती ओळखत असतो? आपल्यातले गुण, आपल्यातले दोष यांचा आपण कधी विचार करत नसतो. आपले गुण आपली ओळख असते. जग आपल्याला किती ओळखते यापेक्षा घरातल्या माणसांना, आपल्या मित्रांना आपण किती ओळखतो? घरातली माणसे, आपले मित्र आपल्याला किती ओळखतात? घरातल्या माणसांनी आपल्याला ओळखायला पाहिजे. हीच आपली खरी ओळख. आपण आपल्या माणसांना ओळखले पाहिजे. त्यांच्या आणि आपल्या जगण्यात अंतर पडता कामा नये. आम्ही एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना ओळखून जगतो. हीच आपली खरी ओळख असते.
ashishningurkar@gmail.com
Comments are closed.