फिरकीच्या तालावर; तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

वेस्ट इंडिज म्हटलं की वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारे घातक आणि तेज तर्रार गोलंदाज डोळ्या समोर येतात. मात्र, याच वेस्ट इंडिजने एका अनोख्या विक्रमाची नोंद करत क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजने एकाही वेगवान गोलंदाजाचा वापर केला नाही. तर, सर्व 50 षटके टाकण्याची जबाबदारी फिरकीपटूंवर सोपवली.

बांगलादेशच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडिमयममध्ये उभय संघांमध्ये सामना सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर वेस्ट इंडिजला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. खेळपट्टी पिरकीपटूंसाठी अनुकूल असल्यामुळे वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सोपवला आणि सर्व षटके त्यांच्याकडूनच टाकून घेतली. अकाएल होसेन, गुडाकेश मोती, रोस्टन चेस, खारी पियरे आणि अॅलिक अथानाझे या फिरकीपटूंनी प्रत्येकी 10 षटके टाकली. त्यामुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 213 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 44.4 षटकांचा खेळ झाला तेव्हा 7 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 32 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे.

Comments are closed.