रानडुक्कर, घोरपडीचं मांस अभिनेत्रीला पुरवलं कोणी? ‘सैराट’ फेम छाया कदमांच्या चौकशीची मागणी

वन्यजीवांची हत्या-शिकार करणे कायद्याने गुन्हा असताना आपण रानडुक्कर, घोरपड, साळिंदर आदी प्राण्यांचे मांस खाल्ल्याचे सांगणाऱ्या ‘सैराट’ फेम अभिनेत्री छाया कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच त्यांना हे मांस पुरवले कोणी, याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मानद वन्य जीवरक्षक रोहन भाटे यांनी केली आहे.

भाटे यांनी याबाबत पश्चिम वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट यांच्याकडे तक्रार केली आहे. अभिनेत्री कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

एका वृत्तवाहिनीने छाया कदम यांची घेतलेली मुलाखत शुक्रवारी (दि. 25) प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने उत्साहाच्या भरात आपण बरेच वन्यप्राणी खाल्ल्याचे म्हटले आहे.

‘मी कोणताही प्राणी खाते. मी रानडुक्कर, पिसोरी… हरणासारखा दिसतो तो, ससा, घोरपड, साळिंदर असे प्राणी खाल्ले आहेत’, अशा बढाया त्यांनी मारल्या. वर, तुम्ही म्हणाल ही बाई आहे की कोण आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. आता त्या मुलाखतीत मिरवलेली ही प्रौढी अभिनेत्रीच्या चांगलीच अंगाशी आली आहे.

Comments are closed.