IND vs AUS: विराटचा विक्रम धोक्यात! अभिषेक शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेत सगळ्यांचे लक्ष युवा फलंदाज अभिषेक शर्माकडे (Abhishek Sharma) असणार आहे. कारण या मालिकेत त्याला विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा विक्रम मोडून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा सध्या एकामागोमाग एक विक्रम मोडत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत अभिषेक शर्मा विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. तो टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद 1,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनू शकतो. सध्या हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 27 डावांत 1,000 धावा पूर्ण केल्या होत्या.
अभिषेक शर्माने आतापर्यंत 23 डावांत 36.91 च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. जर त्याने पुढील तीन डावांत फक्त 149 धावा केल्या, तर तो कोहलीचा विक्रम मागे टाकेल.
अभिषेक शर्मा सध्या टी-20 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. आशिया कप 2025 मध्येही तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने त्या स्पर्धेत 6 डावांत 44 च्या सरासरीने 314 धावा केल्या आणि जवळपास 200 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
2025 या वर्षात एकूण 12 डावांत त्याने 49.41 च्या सरासरीने 593 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 41 षटकार आणि 56 चौकार झळकावले आहेत.
अभिषेक शर्माला अजून भारतासाठी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही. कारण सध्या टीम इंडिया मध्ये स्पर्धा खूप तीव्र आहे. मात्र त्याच्या फॉर्मकडे पाहता लवकरच तो त्या स्वरूपांतही आपला ठसा उमटवेल, अशी अपेक्षा आहे.
Comments are closed.