IND vs ENG: अभिषेक शर्मा सेमीफायनल खेळणार नाही? महामुकाबल्यापूर्वी प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) हा वर्ल्ड कप आतापर्यंत निराशाजनक राहिला असून एका अर्धशतकाशिवाय त्याला मोठी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघात त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांनी अभिषेकच्या निवडीबाबत मोठे विधान केले आहे.
सेमीफायनल सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांना अभिषेक शर्माच्या जागेबाबत विचारण्यात आले. त्यावर मॉर्केल म्हणाले की, अभिषेक सध्या लयीत नसला तरी सेमीफायनल ही त्याच्यासाठी एक नवीन सुरुवात असेल. त्यांनी संकेत दिले आहेत की अभिषेक पुढचा सामना नक्कीच खेळेल. मॉर्केल पुढे म्हणाले, संजू सॅमसनही अशाच परिस्थितीत अडकला होता. अभिषेकसाठी ही शिकण्याची संधी आहे. सेमीफायनल त्याच्यासाठी एक नवीन अध्याय असेल आणि मैदानावर जाऊन चांगली कामगिरी करण्याची त्याच्याकडे मोठी संधी आहे.
भारत आणि इंग्लंडचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टीने (Pitch) सर्वांना संभ्रमात टाकले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या फोटोंमध्ये खेळपट्टीवर गवत दिसत आहे. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊन संघात अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो.
खेळपट्टीबद्दल बोलताना मॉर्ने मॉर्केल म्हणाले, आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. सामन्याच्या दिवशी खेळपट्टी कशी दिसते, यावरच अंतिम संघाची निवड अवलंबून असेल. सध्या खेळपट्टीला पाणी दिले असून ती थोडी मऊ (Soft) आहे, त्यामुळे तिचा अंदाज घेणे कठीण आहे. जर ही खेळपट्टी मोठी धावसंख्या उभारण्यासारखी असेल, तर आम्हाला आमचा दर्जा उंचवावा लागेल.
Comments are closed.