महाराष्ट्राचा समतोल विकास साधू
विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित विकासासह जनतेला न्याय देणार असल्याची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नागपूर: / प्रतिनिधी
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलत होते. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचनप्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचेही स्पष्ट केले. गडचिरोली स्टीलसिटी म्हणून उदयास येत असून येत्या तीन वर्षांत गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. अधिवेशन समाप्त झाले असले तरी लवकरच खातेवाटप होणार असल्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास 16 हजार 219 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिह्यातील 55 हजार शेतकऱ्यांच्या संत्रा पिकांची गळती झाली होती. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीन हेक्टर क्षेत्र मर्यादित प्रमाणे जवळपास 165 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अलमट्टीबाबत सरकार खबरदारी घेणार
सध्या अलमट्टी धरणाच्या उंचीचा प्रश्न चर्चेत असून कोल्हापूर, सांगली येथील शेतकरी, सामान्य नागरिक यांची जिवितहानी, मालमत्ता नुकसान होणार नाही यासाठी राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेईल, असे ते म्हणाले.
पीकविमा गैरप्रकारांची सखोल चौकशी
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते यातून सावरण्यासाठी शासनाने पीक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांसाठी ही चांगली योजना आहे. या योजनेबाबत सदस्यांनी काही गंभीर मुद्दे सभागृहात उपस्थित केले आहेत. त्यामुळे बीडसह राज्यातील अन्य जिह्यात या योजनेबाबत काही गैरप्रकार घडल्या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई – गोवा महामार्ग
मुंबई गोवा या महामार्गाच्या कामातील अडचणी दूर करण्यात करण्यात आल्या आहेत. युध्दपातळीवर या प्रकल्पाचे काम सुरू असून हा महामार्ग पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिका विकास आराखडा संदर्भात सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. या सूचना हरकतींवर सुनावणी घेऊन योग्य निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत असून मागील अडीच वर्षात हाती घेतलेली कामे प्राधान्याने पूर्णत्वाला नेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनाचे सूप वाजले; अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत
उपराजधानी नागपूर येथे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून मुंबईत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर गठित झालेल्या पंधराव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन शनिवारी पार पडले. महायुती सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने अधिवेशनाचे कामकाज सहा दिवस चालले.
Comments are closed.