ईडन गार्डन्सवर फलंदाजांची फटकेबाजी की गोलंदाजांचा दरारा? खेळपट्टीच्या रिपोर्टने सगळ्यांच्या नजरा खिळल्या!

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा सामना उद्या म्हणजेच 1 मार्च रोजी होणार आहे. ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्याला थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळणार आहे. या सामन्यात खेळपट्टीची (Pitch) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. ईडन गार्डन्सवर अनेकदा गोलंदाजांना फायदा होतो, तर कधी फलंदाजांनाही चांगली मदत मिळते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची रणनीती खेळपट्टीवरच अवलंबून असणार आहे.

​भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेळपट्टीचा जो फोटो समोर आला आहे, त्यावरून हे स्पष्ट होत आहे की फलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळणार आहे. क्युरेटरने अशी खेळपट्टी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यावर चेंडू सहजपणे बॅटवर येईल. अशा परिस्थितीत मोठी धावसंख्या उभी राहू शकते. भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या मागील सामन्यातही धावांचा पाऊस पाडला होता. काहीसे असेच चित्र कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरही पाहायला मिळू शकते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा मिळेल, पण एकूणच या खेळपट्टीवर फलंदाजांची चंगळ असणार आहे.

​टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया क्वचितच बदल करेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सर्वच फलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. टीम इंडियाची गोलंदाजी देखील खूप मजबूत आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतात.

​मिडल आणि लोअर मिडल ऑर्डरमध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यावर सर्वांची नजर असेल. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर असेल. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधकांना अडचणीत आणू शकतात. आता या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments are closed.