Asia Cup Final: हार्दिक पांड्या ऐतिहासिक शतकाच्या उंबरठ्यावर! पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये इतिहास रचणार का?

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी, 28 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे (Asia Cup Final IND vs PAK). या सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik pandya) एका खास विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध जर फक्त दोन विकेट्स घेतल्या, तर त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण होतील. सध्या हार्दिकच्या नावावर 98 विकेट्स आहेत.

जर त्याने हा टप्पा गाठला, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम फक्त अर्शदीप सिंगच्या (Arshdeep singh) नावावर आहे. अर्शदीपने 2022 पासून आतापर्यंत 65 सामन्यांत 18.76 च्या सरासरीने 101 विकेट घेतल्या आहेत.

जगभरातल्या सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) पहिल्या स्थानी आहे. त्याने 103 सामन्यांत 13.93 च्या सरासरीने 173 विकेट्स घेतल्या आहेत.

हार्दिक पांड्याने या हंगामातील आशिया कपमध्ये आधीच 4 विकेट घेतल्या आहेत. 2016 पासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 120 टी-20 सामने खेळले असून 26.58 च्या सरासरीने 98 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात 3 वेळा त्याने एका डावात 4 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.

भारताने आशिया कप 2025 मध्ये सलग 6 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पाकिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने गमावले असून हे दोन्ही सामने भारताविरुद्धच हरले आहेत. 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून हरवले होते, तर 21 सप्टेंबर रोजी भारताने पुन्हा पाकिस्तानला 6 गडी राखून मात दिली होती.

आता 28 सप्टेंबर रोजी पुन्हा याच मैदानावर भारत-पाकिस्तान फायनल खेळला जाणार आहे. चाहते मानतात की, अंतिम सामन्यातही भारताचे पारडे जड राहील. पहिल्यांदाच आशिया कपच्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारत-पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत.

Comments are closed.