रोहित शर्मा 45 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळू शकतो! ‘या’ माजी भारतीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएल 2025 दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याआधी त्याने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. आता तो भारतासाठी फक्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या तो 38 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, रोहित 2027 च्या आगामी एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का, की वयानुसार त्याला निवृत्ती घ्यावी लागेल?

यावर भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह (Yograj Singh) (युवराज सिंह यांचे वडील) यांचे मत आहे की, रोहित 45 वर्षांपर्यंत क्रिकेट खेळू शकतो. न्यूज18 शी बोलताना त्यांनी सांगितले, रोहितला दररोज 10 किलोमीटर धावायला लावा, त्याच्यावर चार माणसे कामाला लावा, जर त्याची इच्छा असेल तर तो नक्कीच 45 वर्षांपर्यंत खेळण्याची क्षमता ठेवतो. माझ्या मते खेळाडूंनी जास्तीत जास्त देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे. जितके जास्त तुम्ही देशांतर्गत सामने खेळाल तितके फिट राहाल. रोहित, आम्हाला अजून 5 वर्षे तुझी गरज आहे. त्यामुळे कृपया देशासाठी आणखी खेळ, फिटनेसवर आणि बाकी गोष्टींवर लक्ष दे.

दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना 19 ऑक्टोबरला, दुसरा सामना 23 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 25 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सहभागी होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या मालिकेनंतर रोहित आणि विराट एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा करू शकतात. दोघांनी शेवटचे भारताचे प्रतिनिधित्व 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत केले होते.

Comments are closed.