चौथ्या टी-20 सामन्यात खेळणार का नितीश कुमार रेड्डी? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या मालिकेतील चौथा टी-20 सामना क्वीन्सलँडमधील कॅरारा ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीमचे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केल यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

मॉर्केल यांनी अर्शदीपला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले. त्याचबरोबर पहिल्या तीन टी-20 सामन्यांना मुकलेल्या नीतीश कुमार रेड्डीच्या दुखापतीबाबतही मोठी अपडेट दिली आहे.

मोर्नी मॉर्केल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नीतीशच्या दुखापतीबाबत सांगितले, “होय, नीतीशने आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण केली आहेत किंवा त्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या सर्व तो पूर्ण केल्या आहेत. मग ती फील्डिंग असो, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. नीतीशने सर्व चेकबॉक्स पूर्ण केले आहेत. तो पूर्णपणे फिट आहे की नाही, हे मात्र अस्सेसमेंटनंतर समजेल.”

नीतीश ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. जर नीतीश पूर्णपणे फिट झाला, तर त्याला चौथ्या टी-20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. तो शिवम दुबेची जागा घेऊ शकतो. दुबेचे तिसऱ्या टी-20 सामन्यात चेंडूसह प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले होते, कारण त्याने 3 षटकांत तब्बल 43 धावा दिल्या होत्या.

मोर्नी मॉर्केल यांनी अर्शदीप सिंगला वारंवार प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्याबाबतच्या प्रश्नालाही उत्तर दिले. त्यांनी सांगितले, “अर्शदीप हा एक अनुभवी गोलंदाज आहे. आम्ही मोठ्या चित्रासाठी (big picture) संघातील विविध कॉम्बिनेशन आजमावत आहोत, हे त्याला चांगले ठाऊक आहे. अर्शदीप हा वर्ल्ड-क्लास गोलंदाज आहे आणि त्याने पॉवरप्ले दरम्यान आमच्यासाठी सर्वाधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे आम्हाला त्याची किंमत आणि महत्त्व दोन्ही चांगलेच माहित आहे. मात्र, या दौर्‍यात इतर कॉम्बिनेशनकडे लक्ष देणे आमच्यासाठी गरजेचे आहे आणि अर्शदीपलाही ही गोष्ट पूर्णपणे समजते.”

Comments are closed.