नितीश कुमार यांचा मुलगा सक्रिय राजकारणात येणार?

पाटणा : बिहारचे ‘विक्रमी’ मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या सक्रीय राजकारणात येण्याची चर्चा आता पुन्हा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बिहारच्या गयाजी येथे निशांत कुमार यांची मोठी होर्डिंग्ज लागली असून त्यामुळे ते लवकरच सक्रीय राजकारणात प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी निशांत कुमार गयाजीच्या दौऱ्यासाठी तेथे पोहचले. त्यावेळी संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठी होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावून स्वागत केले. निशांत कुमार किंवा नितीश कुमार यांच्यापैकी कोणीही अद्याप त्यांच्या सक्रीय राजकारण प्रवेशाची घोषणा केलेली नाही. मात्र, संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांपैकी अनेकांनी तशी मागणी केलेली आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तथापि, या संबंधी अधिकृतरित्या कोणतेही संकेत न दिले गेल्याने या चर्चेला फारसे महत्व देण्यात येत नव्हते. आता निशांत कुमार हे बऱ्याच काळानंतर प्रथमच बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत.

Comments are closed.