निवडणूक लढवणार नाही : प्रशांत किशोर
100 सर्वात भ्रष्ट अधिकारी-नेत्यांवर होणार कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बुधवारी केली आहे. हा निर्णय पक्षाने व्यापक हिताच्या अंतर्गत घेतला आहे. जनसुराज पक्षाने बिहार निवडणुकीत विजय मिळविल्यास याचा राष्ट्रव्यापी प्रभाव पडणार आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
मी विधानसभा निवडणूक लढवू नये असा निर्णय पक्षाने घेतला आहे. याचमुळे राघोपूर मतदारसंघात तेजस्वी यादव यांच्या विरोधात आम्ही अन्य उमेदवार उभा केला आहे. जर मी निवडणूक लढलो असतो तर आवश्यक संघटनात्मक कार्यांमधून माझे लक्ष विचलित झाले असते असे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे.
आम्ही बिहारला भू-माफिया, वाळू माफिया आणि अनेक प्रकारच्या माफियांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. या दिशेने आम्ही 6 मोठी आश्वासने दिली असून यात दारूबंदी धोरण संपुष्टात आणणेही सामील आहे. आमचे सरकार येताच एका महिन्याच्या आत 100 सर्वात भ्रष्ट नेते आणि अधिकाऱ्यांची ओळख पटविली जाईल. या भ्रष्ट लोकांच्या विरोधात खटला चालवून त्यांची अवैध संपत्ती जप्त करत राज्याच्या खजिन्यात ती जमा करण्यात येईल. या रकमेतून बिहारच्या विकासाला वेग मिळणार असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
मोठा विजय मिळवू किंवा…
आमचा पक्ष एक तर मोठा विजय मिळवेल किंवा पूर्णपणे पराभूत होईल. एक तर आम्हाला 10 पेक्षा कमी जागा मिळतील किंवा 150 हून अधिक. बिहारमध्ये त्रिशंकू सभागृहाची कुठलीच शक्यता नाही. जनसुराज पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तरीही तो माझ्या दृष्टीकोनातून पराभवच असेल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
रालोआचा पराभव निश्चित
बिहारमध्ये सत्तारुढ रालोआचा पराभव निश्चित आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता पुन्हा कधीच सत्तेवर परतणार नाहीत. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या जागा आणि उमेदवारांवरून गोंधळाची स्थिती असल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
Comments are closed.