पाकिस्तान सुपर लीग 2026 रद्द होणार? डेव्हिड वॉर्नरसह सर्व परदेशी खेळाडूंना धमकी

आयपीएल २०२६ सोबतच पाकिस्तान सुपर लीगची (PSL) देखील सुरुवात होत आहे. एकीकडे आयपीएल फ्रँचायझी लीग सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसाठी मोठे कार्यक्रम आयोजित करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग चाहत्यांशिवाय केवळ २ शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. या लीगवर सध्या मोठे संकट घोंघावत आहे. आता पाकिस्तानच्या एका सशस्त्र गटाने डेव्हिड वॉर्नरसह सर्व परदेशी खेळाडूंना धमकी दिली आहे. जर ते या हंगामात खेळले, तर मोठा हल्ला होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

​सध्याच्या काळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सुरू आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्याचा बदला आता अफगाणिस्तानला घ्यायचा आहे. याच भीतीपोटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पीएसएल २०२६ चे आयोजन प्रेक्षकांशिवाय करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता परिस्थिती अधिकच बिघडली आहे. पाकिस्तानचा सशस्त्र गट ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या ‘जमात-उल-अहरार’ने या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंना आपली नावे मागे घेण्याची सूचना दिली आहे. वास्तविक, हा गट पाकिस्तान सुपर लीग दरम्यान हल्ला करण्याची योजना आखत आहे. अशा परिस्थितीत परदेशी खेळाडू मारले जावेत अशी त्यांची इच्छा नाही, कारण त्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजू शकतो.

​पाकिस्तानचा सशस्त्र गट ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या ‘जमात-उल-अहरार’च्या कमांडरने ‘द संडे गार्डियन’शी बोलताना सांगितले की, “आम्ही संबंधित क्रिकेट बोर्डांना सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या खेळाडूंना पाकिस्तानला पाठवू नये. जर त्यांच्यासोबत काही अघटित घडले, तर ती आमची जबाबदारी नसेल. आम्ही आधीच आमचा इशारा जारी केला आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू, पण आम्ही सामने होऊ देणार नाही. हा टूर्नामेंट विस्कळीत व्हावा आणि खेळाडू मैदानात उतरू नयेत, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू.”

Comments are closed.