पासवान प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी करेल का?

बिहारमध्ये नव्या समीकरणाच्या चर्चेला वेग

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीत एक नवी आघाडी दिसून येण्याची शक्यता आहे. रालोआतील जागावाटपावरून केंद्रीयमंत्री चिराग पासवान संतुष्ट नसल्याचा कयास वर्तविला जात आहे. याचदरम्यान चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षांदरम्यान आघाडी होण्याची चर्चा आहे. चिराग यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे. प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरले असून त्यांनाही एक स्थिर आणि मजबूत मतपेढी असलेल्या राजकीय पक्षासोबत आघाडीचा शोध आहे. तर बिहार आणि युवा फर्स्टचा नारा देणाऱ्या चिराग यांनाही प्रशांत किशोर यांच्या रुपात मजबूत सहकारी मिळण्याची शक्यता आहे.

चिराग पासवान यांनी भाजपकडे 40 जागांची मागणी केली आहे. तर भाजप केवळ 25 जागा देण्यास तयार असल्याचे समजते. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दाखला देत चिराग यांनी ही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही 5 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि सर्व जागांवर विजय मिळविला होता, याचमुळे आमचा स्ट्राइक रेट विचारात घेत अधिक जागा देण्यात याव्या, असे चिराग पासवान यांचे सांगणे आहे. परंतु कमी जागांवर तडजोड करावी लागली तरीही चिराग हे भाजपपासून वेगळे होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे.

भाजपसोबत आघाडीमुळेच चिराग यांच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. भाजपची हक्काची मते त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांना मिळाली होती. तर प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत आहेत. त्यांना मतदान करणाऱ्यांची संख्या आणि किती जागांवर प्रभाव आहे हे अद्याप स्पष्ट नाही. चिराग पासवान हे स्वत:ला बिहारचा भविष्यातील मुख्यमंत्री मानत आहेत, अशास्थितीत ते कुठला मार्ग स्वीकारतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिल्लीत बैठक

दिल्लीत भाजपसोबत रालोआतील घटक पक्षांची जागावाटपावरून बैठक पार पडली आहे. 243 विधानसभा मतदारसंघ असलेल्या बिहारमध्ये बहुमताचा आकडा 122 आहे. प्रशांत किशोरसोबत आघाडीची चर्चा लोकजनशक्ती पक्षाकडूनच पसरविली गेल्याची शक्यता अधिक आहे, या चर्चेच्या माध्यमातून जागावाटपासाठी भाजपवर दबाव निर्माण करण्याचा विचार यामागे पासवान यांचा असू शकतो.

 

Comments are closed.