हसीना यांना ताब्यात देण्यासाठी हिंदुस्थानवर दबाव टाकणार, सत्तेवर येताच सल्लाउद्दीन यांची कठोर भूमिका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हिंदुस्थान आणि बांगलादेशातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही हिंदुस्थानवर दबाव टाकू, असे वक्तव्य बीएनपीचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनी केले आहे. मोहम्मद युनूस यांचे काळजीवाहू सरकार सत्तेत असताना बीएनपीने हीच भूमिका घेतली होती. आता बांगलादेशात बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे सरकार स्थापन होणार असून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. अहमद यांच्या वक्तव्यावर हिंदुस्थानने प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीएनपीने 299 पैकी 212 जागा जिंकल्या असून दोन जागांचा निकाल निवडणूक आयोगाने रोखला आहे. बीएनपीने बहुमत प्राप्त केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांना सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. त्यावर बीएनपीनेदेखील उत्तर देत मोदींचे आभार मानले. तारिक रहमान यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, असे बीएनपीने म्हटले. त्यानंतर सलाहुद्दीन अहमद यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की आम्ही नेहमी कायद्यानुसार हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करतो. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही भारतावर दबाव टाकू. आम्ही भारत सरकारला असे आवाहन करू, की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावे. त्या बांगलादेशात आल्यानंतर त्यांची न्यायालयीन लढाई लढतील. हा दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधील मुद्दा आहे. आम्ही त्यावर पुढील काळात काम करू, असे अहमद म्हणाले.

ही निवडणूक म्हणजे सुनियोजित फार्स

बांगलादेशातील निवडणुकीत बीएनपीने बहुमत मिळवले. या निवडणुकीत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली होती. आता निकालानंतर शेख हसीना यांनी ही निवडणूक म्हणजे काळजीवाहू सरकारचा एक सुनियोजित फार्स असल्याची टीका केली आहे. तटस्थ काळजीवाहू सरकारच्या हाताखाली सर्वांना सामावून घेत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याची मागणी शेख हसीना यांनी केली आहे. या निवडणुकीत अवामी लीगच्या अनुपस्थितीत मतदारांचे हक्क आणि राज्यघटनेची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. हा सर्व एक फार्स होता. त्यांनी बूथ ताब्यात घेतले, गोळीबार केला आणि त्यांच्याच प्रतिनिधींनी मतपत्रिकांवर शिक्के मारले. निकाल पत्रिकादेखील त्यांच्याच प्रतिनिधींनी तयार केल्या, असा आरोपही हसीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून केला आहे.

Comments are closed.