शाळेमुळे उद्ध्वस्त झालं ‘या’ स्टार क्रिकेटरचे करिअर! वयाच्या 27 व्या वर्षीच घ्यावी लागली निवृत्ती

खेळाडूंचे उत्तम भविष्य निर्माण करण्याचा पाया सामन्यपणे शाळा रचते, मात्र एका क्रिकेटपटूच्या बाबतीत उलटे झाले आहे. त्याची कारकीर्द शाळेमुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप त्याने केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी फलंदाज विल पुकोवस्की (Will Pucovski) याने मेलबर्नमधील ‘ब्राइटन ग्रामर’ या खाजगी शाळेवर कायदेशीर कारवाई केली आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा पुढील ‘स्टीव्ह स्मिथ’ म्हणून पुकोवस्कीच्या नावाची चर्चा होती. आता मात्र त्याची कारकीर्द वयाच्या 27 व्या वर्षीच संपुष्टात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुकोवस्कीच्या वकिलांनी एक दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन रूल्स फुटबॉलच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान त्याला झालेल्या डोक्याच्या दुखापतीला शाळेने चुकीच्या पद्धतीने हाताळले होते.

पुकोवस्कीला 2014 मध्ये झालेल्या पहिल्या डोक्याच्या दुखापतीनंतर (कन्कशन) शाळेच्या निष्काळजीपणामुळे त्याची कारकीर्द लवकर संपली, असा आरोप त्याने केला आहे.

पुकोवस्कीला वयाच्या 16 व्या वर्षी, फुटबॉलच्या सरावादरम्यान डोक्याची दुखापत झाली होती. यानंतर तो आजारी पडला, मात्र शाळेने त्याला उपचारासाठी पाठवले नाही. तर त्याला पुन्हा सरावासाठी मैदानात उतरण्यास सांगितले. त्यामुळे त्याची प्रकृती आणखीनच खालावली.

पुकोवस्कीला त्याच्या कारकीर्दीत 13 वेळा डोक्याची गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याला वैद्यकिय सल्ल्यानुसार गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वयाच्या 27 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती व्हावे लागले. त्या दुखापतींपैकी पहिली दुखापत त्याला शाळेत झाली होती.

पुकोवस्कीची कारकीर्द
वरच्या फळीतील या उजव्या हाताच्या फलंदाजाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत केवळ एकच सामना खेळला आहे. कसोटी प्रकाराच्या त्या सामन्यात त्याने 2021 मध्ये सिडनी येथे भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या त्या पहिल्या डावात पुकोवस्कीने सलामीला येत 110 चेंडूंत 62 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या डावात 10 धावा करत बाद झाला. त्या सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आणि तो गाबाच्या मालिका निर्णायक सामन्याला मुकला. त्याच्या डोक्याला वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीचा शेवट झाला.

पुकोवस्कीला मार्च 2024 मध्ये शेफिल्ड शील्डच्या सामन्यावेळी पुन्हा डोक्याची दुखापत झाली. त्यानंतर त्याने एका स्वतंत्र वैद्यकिय समितीच्या सल्ल्यानुसार क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर पुकोवस्कीने 36 प्रथम श्रेणी आणि 14 लिस्ट ए चे सामने खेळले आहेत. (Will Pucovski takes legal action on school for head injury Had to retire at 27)

Comments are closed.