IND vs AUS: चौथ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या क्वीन्सलँडच्या हवामानाचा अंदाज
रोमांच आणणारा खरा खेळ आता सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथा टी-20 सामना 6 नोव्हेंबर रोजी क्वीन्सलँडमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका कोणाच्या बाजूने झुकते, हे या सामन्यानंतर स्पष्ट होईल.
तिसऱ्या टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) संघाने होबार्टमध्ये जबरदस्त कामगिरी करत मैदान गाजवलं होतं. अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) गोलंदाजीमध्ये गारद उडवली, तर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) फलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने सुंदर खेळी साकारली. मात्र, चौथ्या टी-20 चा थरार पावसामुळे फिका होणार का, अशी चाहत्यांमध्ये पुन्हा चिंता दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया, सामना होणार त्या दिवशी क्वीन्सलँडमध्ये हवामान कसं असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यावर पावसाचं सावट अजिबात नाही. हवामान खात्यानुसार, क्वीन्सलँडमध्ये सामन्याच्या दिवशी इंद्रदेवांचा मूड एकदम प्रसन्न राहणार आहे. त्यामुळे चाहत्यांना 40 षटकांचा रोमांचक सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
याआधी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर मेलबर्नमध्येही हवामानाने थोडी खोडी काढली होती. मात्र आता चौथ्या सामन्यावेळी आकाश एकदम स्वच्छ राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. मेलबर्नमध्ये कांगारू संघाने दमदार प्रदर्शन करत सूर्या अँड कंपनीला 4 गडी राखून हरवलं होतं. पण होबार्टमध्ये भारताने अप्रतिम पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं.
प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेल्या बदलांचा फायदा टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात नक्कीच झाला. वॉशिंग्टन सुंदरने केवळ 23 चेंडूंमध्ये 49 धावांची विस्फोटक खेळी साकारत सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला. त्याचप्रमाणे मालिकेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या अर्शदीप सिंगसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गुडघे टेकले. अर्शदीपने तीन महत्त्वाचे बळी घेत संघाला विजय मिळवून दिला.
Comments are closed.