Ind vs SA: गिलच्या जागी सॅमसनला मिळणार संधी? चौथ्या टी20मध्ये असा असणार भारतीय संघ!

मुल्लांपूरमधील पराभवानंतर टीम इंडियाने धर्मशाला येथे जोरदार पुनरागमन केले. अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त मारा करत दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 117 धावांत गुंडाळला. त्यानंतर फलंदाजांनीही धमाकेदार कामगिरी केली. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेत भारतीय संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे.

मालिकेतील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मात्र, गेल्या सामन्यात विजय मिळवूनही भारतीय संघ आपल्या ‘प्लेइंग 11’ मध्ये एक किंवा दोन बदल करण्याचा विचार करू शकतो.

शुबमन गिलची या मालिकेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यांत केवळ 4 धावा केल्यानंतर, तिसऱ्या टी20 सामन्यात गिलच्या बॅटमधून 28 धावा निघाल्या. मात्र, या धावा करण्यासाठी त्याने 28 चेंडूंचा सामना केला होता. सलग तीन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर, टीम मॅनेजमेंट आता गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्याबाबत विचार करू शकते.

संजूचा टी20 मध्ये सलामीवीर म्हणून रेकॉर्ड अप्रतिम राहिला आहे आणि त्याने अभिषेक शर्मासोबत मिळून काही दमदार खेळी खेळल्या आहेत. मात्र, सॅमसनला या मालिकेतील तिन्ही सामन्यांत बेंचवरच बसावे लागले आहे.

चौथा टी20 सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, जिथली खेळपट्टी थोडी संथ असते. या मैदानावर चेंडू बराच अडकून येतो, त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. याच कारणामुळे, या सामन्यात टीम मॅनेजमेंट शिवम दुबे किंवा हर्षित राणा यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याबाबत विचार करू शकते. सुंदर गोलंदाजीसोबतच फलंदाजीमध्येही मोलाचे योगदान देऊ शकतो.

भारताची प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, शुभमन गिल/संजू सॅमसन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, हर्षित राणा/वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

Comments are closed.