सूर्यकुमार यादवची अवस्था होणार रोहित सारखीच? टी20 कर्णधाराला वाटतीये 'ही' भीती
भारतीय क्रिकेट संघात गेल्या एका वर्षात अनेक मोठे बदल दिसून आले आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिलला इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीही गिलला वनडेचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) आणि निवडकांनी शुबमन गिलवर मोठा विश्वास दाखवला आहे. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे आहे, तरीही त्याला कर्णधारपद गमावण्याची भीती वाटत आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच टी20 आशिया कप जिंकला आहे. तसेच, भारतीय संघ आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्येही शीर्ष स्थानावर आहे. सूर्यकुमारला वाटते की एकदा चूक झाली, की कर्णधारपद त्यांच्याकडे न राहता शुबमन गिलकडे जाऊ शकते. या भीतीबाबत सूर्यकुमार यादवने स्वतःच खुलासा केला आहे.
सूर्यकुमार यादवने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शुबमन गिलबाबत सांगितले, “मला खूप आनंद आहे की तो दोन फॉरमॅट्सचा कर्णधार आहे. तो खरोखरच खूप चांगले काम करत आहे. पण मी खोटं बोलणार नाही, प्रत्येकाला ही भीती वाटते. पण ही अशी भीती आहे जी तुम्हाला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते.”
सूर्यकुमार यादवने शुबमन गिलसोबतच्या त्याच्या नात्याबाबत सांगितले, “आपण दोघेही मैदानाच्या आत आणि बाहेर उत्तम समन्वय ठेवतो. मला माहित आहे की तो कसा खेळाडू आणि माणूस आहे. पण हीच गोष्ट मला प्रेरणा देते आणि मी त्याच्या यशासाठी खूप आनंदी आहे.”
शुबमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कर्णधारपद निभावत आहे, तर सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
Comments are closed.