आज आयकर बिल मंजूर केले जाईल?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार : पुढील आठवड्यात संसदेत मांडणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्र सरकार संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहात नवे प्राप्तिकर विधेयक सादर करणार आहे. आज शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकावर चर्चा होणार असून त्याला बैठकीची संमती मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी ते संसदेत सादर केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-2026 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचे सादरीकरण करत असताना त्यांनी प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन केले होते. मात्र, हे विधेयक प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत होण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ते शुक्रवारच्या बैठकीसमोर सादर करण्यात येईल. या विधेयकाला या बैठकीची मान्यता मिळणार, हे निश्चित आहे. त्यानंतर सोमवारी ते लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करण्यात येईल.

अनेक सुधारणा

केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये करदात्यांच्या सोयीसाठी अनेक करसुधारणा केल्या आहेत. फेसलेस अॅसेसमेंट, विवाद से विश्वास, करदात्यांचे चार्टर, वेगवान करपरतावा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने करदात्यांना मोठी सुविधा प्राप्त झाली आहे. विश्वास प्रथम, नंतर तपासणी हे धोरण आम्ही लागू केले आहे, असे निर्मला सीतारामन यांनी अर्थसंल्कपीय भाषणात स्पष्ट केले होते. नियमांसंबंधी स्पष्टता आणण्यात आली आहे. त्यामुळे या विधेयकाचा करदात्यांना मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

नव्या विधेयकात काय असेल…

नवे प्राप्तिकर विधेयक अतिशय सोप्या भाषेत आहे. कोणत्याही करदात्याला तज्ञाच्या साहाय्याशिवाय ते समजू शकेल, अशाप्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे. जुन्या कायद्यातील जटीलता आणि अनावश्यक भाग काढून टाकला गेला आहे. नवे विधेयक न्यायाच्या भावनेला पुढे नेणार आहे. या नव्या विधेयकाचे आकारमान पूर्वीच्या कायद्याच्या अर्ध्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे ते वाचणे आणि स्वत:बरोबर बाळगणे या बाबी सोप्या होणार आहेत. या विधेयकाचा आशय आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा असून सरळ आणि सोप्या भाषेत त्याची मांडणी करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायद्यांमधील संदिग्धता आणि अवजडपणा या नव्या विधेयकात असणार नाही, अशी माहिती वित्त विभागाच्या वतीने देण्यात आली.

Comments are closed.