हा हायड्रोजन बॉम्ब कॉंग्रेसवर स्फोट होईल?
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगालावर केलेल्या टीकेचा परिणाम काय, यावर काँग्रेसमध्येच चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या कथित ‘मतचोरी’ प्रकरणात केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांना साहाय्य करण्यासाठी निवडणूक आयोग मतदार घोटाळा करीत आहे, असा गांधी यांच्या आरोपाचा गाभा आहे. तथापि, याचा विपरीत परिणाम काँग्रेसलाच भोगावा लागणार का, अशी चर्चा आता राजकीय तज्ञांच्या वर्तुळात आणि काँग्रेसमध्येही रंगू लागल्याचे दिसत आहे.
गेल्या मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करत 6 हजारांहून अधिक मतांची काटछाट झाल्याचा आरोप केला होता. तथापि, कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. या मतदारसंघात 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार 10 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाला होता. गेल्या 29 वर्षांमध्ये या मतदारसंघात प्रथमच काँग्रेसला विजय मिळाला होता, अशी स्थिती असताना काँग्रेसच्या मतदारांची नावे हेतुपुरस्सर वगळण्यात आली, हा गांधी यांचा आरोप खरा ठरत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केवळ 24 नावे वगळली
या मतदारसंघात 2023 च्या विधानसभा निवडणुकीत ‘कोणीतरी’ मतदारांची नावे ऑनलाईन डीलीट करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब प्रत्यक्ष निवडणूक आयोगानेच त्यावेळी उघड केली होती. तसेच पोलीसांमध्ये या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तक्रारही सादर केली होती. हे प्रकरण जवळपास दोन वर्षांपूर्वीचे आहे. निवडणूक आयोगाने पोलीसांना सर्व माहितीही पुरविली होती. ज्या मोबाईलवरुन हा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला होता, त्याचा क्रमांक आणि मतदारांची माहितीही आयोगाने पोलिसांनी पुरविली होती. तसेच संबंधित मतदान केंद्रांवर सहा हजारांहून अधिक नावे नव्हे, तर केवळ 24 नावे वगळण्यात आली होती असेही स्पष्टीकरण कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही नावे निवडणूक आयोगाने नियमांच्या अनुसार वगळली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे प्रत्युत्तरही आयोगाकडून यांना मंगळवारीच देण्यात आले होते.
हा मुद्दा टिकाव धरु शकतो काय
सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. ही निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन या दोघांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे राहुल गांधी हा मतदार घोटाळ्याचा मुद्दा लावून धरत आहेत, असे दिसत आहे. तथापि, गांधी यांचा हा हैड्रोजन बाँब कितपत प्रभावी ठरणार याची चर्चा आता प्रत्यक्ष त्यांच्याही पक्षात होत आहे. कारण आतापर्यंत गांधी यांनी तीन वेळा निवडणूक आयोगाला लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, या प्रयत्नांना म्हणावा तसा निर्णायक प्रतिसाद जनतेतून मिळताना दिसत नाही, असे अनेक तज्ञांचे मत आहे. बिहारमध्ये राहुल गांधी यांनी व्होटर अधिकार यात्रा काढली होती. पण या मुद्द्यापेक्षा अन्य मुद्दे अधिक प्रभावी ठरतील, अशी भावना महागठबंधनमधील इतर पक्षांची आहे. म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी अन्य मुद्द्यांवर वेगळी यात्रा काढण्याचा निर्णय घेऊन प्रारंभही केला आहे. यातून महागठबंधनमधील मतभेद दिसून येतात, असे मत व्यक्त होत आहे.
काँग्रेसमध्येच कुजबुज
केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य करुन गांधी लोकशाही प्रक्रियेलाच संशयाच्या चक्रात अडकवत आहेत. ज्या लोकशाही प्रक्रियेमुळे काँग्रेस सत्तेत आली आणि आजही काही स्थानी येत आहे, तिच्यावरच संशय व्यक्त करणे काँग्रेससाठीच त्रासदायक होऊ शकते, असे मत काँग्रेसच्या एका माजी कार्यकारीणी सदस्याने व्यक्त केले आहे, असे एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे. तसेच आतापर्यंत बिहारसंबंधी जी मतदार सर्वेक्षणे येत आहेत, त्यांच्यानुसार केवळ 18 ते 20 टक्के मतदार गांधी यांच्या मतघोटाळ्याच्या आरोपाला पाठिंबा देताना दिसतात. तब्बल 64 टक्के मतदारांचा सध्याच्या निवडणूक यंत्रणेवर विश्वास असल्याचेही या सर्वेक्षणांमध्ये आढळले आहे. काँग्रेसचा स्वत:चा फिडबॅकही या मुद्द्यावर अनुकूल नाही, असेही बोलले जात आहे. त्यामुळे ही चर्चा आता रंगली आहे.
परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह
ड निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याच्या गांधींच्या प्रयत्नांवर अनेक प्रश्न
ड काँग्रेसच्या मित्रपक्षांकडूनही या आरोपांना म्हणावा तसा प्रतिसाद नाही
ड या मुद्द्यापेक्षा इतर जनतेच्या अधिक जिव्हाळ्याचे मुद्दे प्रभावी ठरणे शक्य
ड या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या अतिभरावर काँग्रेसमध्येही विचारमंथन
Comments are closed.