आम्ही इथेनॉलसाठी कॉर्न आयात करू?

भारत-अमेरिका व्यापार करार चर्चा प्रगतीपथावर

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन दोन्ही देशांनी केले आहे. भारत अमेरिकेकडून इथेनॉलनिर्मितीसाठी मका आयात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचा आग्रह भारताने सोयाबिनही विकत घ्यावे असा आहे. त्यासंबंधात चर्चा केली जात आहे. रशियाकडून भारत विकत घेत असलेल्या कच्च्या इंधन तेलाचाही प्रश्न आहे. मात्र, हे सर्व प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेने भारताला जनुकसुधारित अन्नपदार्थांची आयात करण्याचा आग्रह केला आहे. तथापि. भारताने अशी उत्पादने विकत घेण्यास नकार दर्शविला आहे. अमेरिकेत जनुक सुधारित उत्पादने मोठ्या प्रमाणात पिकविली जातात. तथापि, भारतात अशा उत्पादनांना मोठा विरोध आहे. तथापि, भारताला मोठ्या प्रमाणात इथेनॉलची आवश्यकता असून भारत ते पेट्रोलमध्ये मिश्रीत करण्यासाठी उपयोगात आणत आहे. अमेरिकेकडून मका खरेदी करुन त्याच्यापासून इथेनॉल भारतात बनविल्यास एक नवा उद्योग स्थापन होईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि इथेनॉलची आवश्यकताही भागेल. भारतात मका हे पिक फार मोठ्या प्रमाणात होत नाही. तसेच भारतीयांच्या आहारातही मक्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे अमेरिकेकडून मका आयात केला तरी, भारताच्या शेतकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही, असे प्रतिपादन केले जात आहे.

‘डेडलाईन’ गाठणारच

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार करण्यासाठी दोन्ही देशांनी या वर्षाच्या अखेरपर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. सध्या ज्या वेगाने चर्चा होत आहे, त्यानुसार या कालावधीपर्यंत करार निश्चित पेला जाईल, असा विश्वास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लावल्याने सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाला आहे.

तेलाचा मुद्दा

भारताने रशियाकडून इंधन तेल घेणे थांबवावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे. आतापर्यंत भारताने त्याला नकार दिला आहे. यामुळे व्यापार चर्चेत अडथळा निर्माण झाला आहे. तो दूर करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न केले जात आहेत. रशियाचे तेल स्वस्तात मिळत असल्याने भारत ते खरेदी करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.