World Cup 2026: वर्ल्ड कप खेळायला भारतात येणार की नाही? बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने दिले धक्कादायक उत्तर!

2026 चा टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ भारतात येणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. या वादावर आता बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने (Liton Das) एक अतिशय चकित करणारे विधान केले आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचारामुळे हा वाद सुरू झाला. त्यानंतर मुस्तफिझूर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर करण्यात आले. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला संघ वर्ल्ड कपसाठी भारतात पाठवणार नसल्याचे संकेत दिले होते.

‘बांगलादेश प्रीमियर लीग’ दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत लिटन दासला विचारण्यात आले की, तुम्हाला खात्री आहे का की आपण वर्ल्ड कपसाठी जाणार आहोत यावर उत्तर देताना लिटन म्हणाला, तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही, आपण दोघेही एकाच गोंधळात आहोत. वर्ल्ड कप अजून लांब आहे. आपण वर्ल्ड कप खेळायला जाणार की नाही, हे सध्या आम्हालाही नक्की माहित नाही.

लिटन दास पुढे म्हणाला की, सध्या सर्वजण बांगलादेश प्रीमियर लीग खेळत आहेत. पण जर आम्हाला आमचा गट (Group) कोणता आहे किंवा आम्ही कोणत्या देशात खेळायला जाणार आहोत हे माहित असते, तर त्याची मदत झाली असती. आतापर्यंत एकाही खेळाडूला हे माहित नाही की आम्ही कोणत्या देशात जाणार आहोत आणि कोणाविरुद्ध खेळणार आहोत. माझ्याप्रमाणेच संपूर्ण बांगलादेश सध्या संभ्रमात आहे.

लिटन दासने एक मोठा खुलासा करताना सांगितले की, या वादाबाबत खेळाडूंशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा त्यांची परवानगी घेतली गेलेली नाही. तो म्हणाला, या विषयावर माझ्याशी अद्याप कोणाचेही बोलणे झालेले नाही. आयुष्यात अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, पण परिस्थितीनुसार आपल्याला जुळवून घ्यावे लागते.

Comments are closed.