राज्याच्या विकासासाठी काम करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तामिळनाडूत प्रतिपादन, 13,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
तामिळनाडू राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसमवेत सहकार्य करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. त्यांच्या हस्ते रविवारी 13 हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर भाषण करताना त्यांनी केंद्र सरकारची विकासासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना हे आश्वासन दिलेले आहे.
वृत्तसंस्था, चेन्नई
केंद्र सरकारने तामिळनाडूच्या पूर्वीच्या सरकारांसमवेतही काम केले आहे. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकारे या राज्यात कार्यरत होती, तेव्हा त्यांच्याशीही केंद्राने विकासकार्यांसाठी सहकार्य केले होते. विकासाच्या संदर्भात केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट असून ती राजकारणातीत अशी आहे, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले असून ते राज्यातील जनतेला अर्पण करण्यात आले ाहेत. काही नव्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील मेट्रो प्रकल्प हा पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधील सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे. 2014 मध्ये राज्यात केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो सुविधा होती. आता ती या राज्यातील पंचवीस शहरांमध्ये विस्तारित करण्यात आली आहे. इतर काही शहरांमध्ये अनेक औद्योगिक प्रकल्प साकारले गेले असून ते रोजगारांच्या निर्मितीसाठी उपयोगी ठरत आहेत. या प्रकल्पांमुळे तामिळनाडू राज्याच्या आर्थिक सामर्थ्यात वाढ होणार आहे. भविष्य काळात आणखी प्रकल्प या राज्यात स्थापन होतील. आतापर्यंतच्या तामिळनाडू सरकारांनी औद्योगिक उत्पादनांना मोठे प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आज हे राज्य उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने रोजगारनिर्मिती केली जात आहे. नव्या संधीचा युवकांनी लाभ उठवावा, असे आवाहनही त्यांनी भाषणात केले आहे.
चेन्नई मेट्रो विस्ताराचे उद्घाटन
या मुख्य कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूनमल्ली-वाडापलानी या चेन्नई मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाला 4 हजार 900 कोटी रुपये खर्च आला आहे. या मेट्रोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय यांनी एकत्र प्रवास काहीकाळ केला. त्यांच्यासह तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर हे देखील होते. केंद्र सरकारने कोईंबतूर आणि मदुराई या शहरांमधील मेट्रो प्रकल्पांमध्येही लक्ष घालावे, अशी विनंती मुख्यमंत्री विजय यांनी त्यांना केली. राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि जनतेच्या सोयीसाठी हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठीही अशा प्रकारचे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात यावेत, अशी सूचना मुख्यमंत्री विजय यांनी भाषणात केली.
सत्ताकाळाची 25 वर्षे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सलग 25 वर्षे सत्तेवर राहण्याचा विक्रम केला आहे. प्रथम ते 2001 पासून 2014 पर्यंत सलग 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिला आहे. 2013 मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. 2014 ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमताने जिंकली. गेली 12 वर्षे ते देशाचे सर्वोच्च नेते आहेत. या विक्रमाचाही उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या भाषणात केला. भारताचा सातत्याने विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Comments are closed.