बलात्कार प्रकरणात आरसीबीचा गोलंदाज यश दयाल जाणार तुरुंगात? हायकोर्टाने अटकेला स्थगिती देण्यास दिला नकार

यश दयाल: आयपीएलमध्ये मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून खेळणाऱ्या उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज यश दयालला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. एका अल्पवयीन मुलीवर कथित बलात्काराच्या प्रकरणात आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अटकेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. (Yash Dayal Rajasthan High Court)

राजस्थान उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी क्रिकेटरला अटकेपासून कोणताही अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नाही. जयपूरमध्ये या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती सुदेश बन्सल यांनी केस डायरी मागवून पुढील सुनावणीची तारीख 22 ऑगस्ट निश्चित केली आहे. (Yash Dayal rape case)

उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान क्रिकेटर यश दयालचे वकील कुणाल जैमन यांनी असा युक्तिवाद केला की, हे प्रकरण क्रिकेटरला बदनाम करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. त्यांनी दावा केला की, याच प्रकारचा बलात्काराचा एक गुन्हा गाझियाबादमध्ये नोंदवला गेला होता, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

यश दयालच्या वकिलांनी आरोप केला, “त्या घटनेच्या बरोबर सात दिवसांनंतर जयपूरमध्ये आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला. असे दिसते की, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून ब्लॅकमेल करणारी एखादी टोळी सक्रिय आहे.” पण, सांगानेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल जैमन यांनी जयपूर प्रकरणाचे तपशील देताना सांगितले की, तक्रारदार मुलगी, जी घटनेच्या वेळी अल्पवयीन होती, ती एका क्रिकेट कार्यक्रमादरम्यान यश दयालच्या संपर्कात आली होती.

त्यानंतर तिने सुमारे दोन वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याच्या बहाण्याने यश दयालवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला. पोलिसांनुसार, यश दयालने कथितरित्या आयपीएल 2025च्या हंगामात जयपूरच्या सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये मुलीला आपल्या खोलीत बोलावून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पहिल्या घटनेच्या वेळी पीडितेचे वय 17 वर्षे असल्यामुळे, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांसह ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याअंतर्गत देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (Yash Dayal POCSO Act)

Comments are closed.