केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर मोठी उलथापालथ! न्यूझीलंड टी20 संघात या दोन खेळाडूंचे पुनरागमन

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (NZ vs WI) यांच्यात 5 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला असून, मिचेल सॅन्टनरला (Mitchell Sentener) संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वीच माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. विल्यमसनच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडच्या टी20 संघात मोठे बदल झाले असून, दोन खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.

केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर काइल जेमिसन आणि ईश सोढी या दोघांचे न्यूझीलंड टी20 संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघेही बऱ्याच काळापासून संघाबाहेर होते. जेमिसनने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध वनडे स्वरूपात खेळला होता, तर सोढी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसला होता. या दोघांच्या परतीमुळे न्यूझीलंडचा गोलंदाजी विभाग अधिक मजबूत झाला आहे.

अष्टपैलू खेळाडू नॅथन स्मिथलाही या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. फलंदाजीत डेवॉन कॉन्वे, मायकेल ब्रेसवेल, रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी असेल. तर गोलंदाजीची सूत्रे सॅन्टनर, सोढी आणि जेमिसन या अनुभवी खेळाडूंकडे असतील.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानुसार, सध्या संघातील 5 खेळाडू जखमी आहेत. फिन अ‍ॅलेन, लॉकी फर्ग्युसन, अ‍ॅडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स आणि बेन सीअर्स. मॅट हेनरीला विश्रांती देण्यात आली आहे.
फिन अ‍ॅलेनच्या पायाला दुखापत झाली आहे, फर्ग्युसन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे, मिल्नेच्या घोट्याला समस्या आहे, फिलिप्सला ग्रोइन इंजरी आहे आणि सीअर्सलाही हॅमस्ट्रिंगची तक्रार आहे.

त्याचबरोबर, हे सर्व खेळाडू टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी फिट होण्याची शक्यता आहे आणि ते त्या स्पर्धेसाठी उपलब्ध असतील.

Comments are closed.