IND vs ZIM: कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विजय! सामन्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?
भारतीय संघाला गेल्या 7 टी20 सामन्यांमध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. आयर्लंडविरूद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाला 2-0 ने आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाला 4-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला विजयाचा सूर गवसला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना झिम्बाब्वेने अवघ्या 125 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यातील विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “अप्रतिम, मला माझा पहिला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी दमदार खेळ केला. मला याहून जास्त आनंद होऊ शकत नाही. मला आधीपासूनच अशी अपेक्षा होती की, खेळपट्टीवर बाऊन्स असेल. विशेषतः हार्ड लेंथवरून. सुरुवातीला बाऊन्स कमी जास्त होता. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की दोन्ही डावांमध्ये ही गोष्ट जाणवत होती.”
या सामन्यात झिम्बाब्वेने 120 हून अधिक धावा केल्या. झिम्बाब्वेला कमी धावांवर रोखण्याबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “प्रत्येक संघात असा एक फलंदाज असतो, जो संघाला शेवटपर्यंत घेऊन जातो आणि एका सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत करतो. मला वाटतं, त्यांनी खेळपट्टीचा अचूक अंदाज लावला आणि भागीदारी रचायला सुरुवात केली. मी गोलंदाजीत बदल करण्यावर जास्त भर दिला. कारण आम्हाला इथून पुढे आणखी 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सर्वांना गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास, त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.”
या सामन्यात धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूंचा सामना करत दमदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान वैभवच्या फलंदाजीबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, “अप्रतिम फलंदाजी, तो एक निडर तरुण खेळाडू आहे. ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली, ती थक्क करणारी होती. मला वाटतं, त्याने याआधीही इथे फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. अंडर 19 फायनलमध्ये त्याने 175 धावांची खेळी केली होती. त्यामुळे मैदानात उतरताना आत्मविश्वास वाढलेला असतो. हे पाहून मला खूप आनंद झाला. मालिकेची सुरुवात खूप छान झाली आहे.”
Comments are closed.