CV ठेवा तयार! देशातील ‘या’ नामांकित कंपनीत 10 ते 12 हजार उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार
नोकरीच्या बातम्या: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. Wipro कंपनीत लवकरच मोठी नोकरभरती होणार आहे. विप्रो ही देशातील चौथी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी आहे. पुढील आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ही कंपनी10000 ते 12000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी डिसेंबर तिमाहीचे आकडे जाहीर केल्यानंतर विप्रोने ही घोषणा केली आहे.
विप्रोत मोठ्या प्रमाणात नोकरभरती
विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मोठ्या संख्येने लोकांना कामावर घेत आहोत. जे लोक यूएसमध्ये स्थानिक आहेत आणि आज यूएसमधील आमच्या कर्मचाऱ्यांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. आमच्याकडे H-1B व्हिसाचा चांगला साठा आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही लोकांना हलवू शकतो. मागणी वाढल्यास, पुरवठ्याची बाजू आमच्यासाठी अडथळा ठरणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान, विप्रो नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करणार असल्यानं तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जे युवक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
प्रत्येक तिमाहीत 2500-3000 फ्रेशर्स कंपनीत सामील होणार
सौरभ गोविल म्हणाले की, कंपनीने त्यांचे सर्व प्रलंबित प्रस्ताव स्वीकारले आहेत. कंपनी प्रत्येक तिमाहीत 2,500-3,000 ‘फ्रेशर्स’ भरती करणार आहे. याचा अर्थ प्रत्येक आर्थिक वर्षात 10,000-12,000 ‘फ्रेशर्स’ समाविष्ट केले जातील. कंपनी पुढील वर्षी देशातील विविध कॅम्पसमधून 10-12 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल.
विप्रोच्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली
चालू आर्थिक वर्षाच्या (2024-25) तिसऱ्या तिमाहीत विप्रोच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,157 ने कमी झाली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कर्मचाऱ्यांची संख्या 2,32,732 होती, तर ती जुलै-सप्टेंबर तिमाहीत 2,33,889 आणि आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत 2,39,655 होती.
कर्मचाऱ्यांना अंतरिम लाभांश जाहीर
चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत विप्रोचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 24.4 टक्क्यांनी वाढून सुमारे 3,354 कोटी रुपये झाला आहे. विप्रोने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, समीक्षाधीन कालावधीत कंपनीचा परिचालन महसूल 0.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 22,319 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, विप्रोला आगामी मार्च तिमाहीत IT सेवा व्यवसायातून 2602 दशलक्ष डॉलर ते 2655 दशलक्ष डॉलर दरम्यान महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. विप्रोनेही प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला.
महत्वाच्या बातम्या:
Artificial Intelligence : AI चा कोर्स करा, लाखो रुपयांचा पगार मिळवा, करिअरची मोठी संधी
अधिक पाहा..
Comments are closed.