संभाजीनगरात शिवसेना उमेदवारांना माघार घेण्यास धमकी, हिशेब ठेवला जाईल; अंबादास दानवे यांनी दिला इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमकावण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.

दानवे यांनी म्हटले आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मंत्री हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी दबाव टाकत आहेत. या प्रक्रियेत काही अधिकारीदेखील सत्ताधारी पक्षाचे “गुलाम” बनल्याप्रमाणे फोन करून पाठपुरावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“लक्षात ठेवा, आमच्याकडेही खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल आणि वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड निश्चित होणार आहे. आपले काम आणि नीतिमत्ता विसरून काम करणाऱ्यांचा बाजार मुळासकट उठवला जाईल,” अशा शब्दांत दानवे यांनी इशारा दिला.

Comments are closed.