एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पोलीस अधिकार्याच्या मानसिक छळाला कंटाळून फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर कोठरबन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर होण्यासाठी काढलेले शैक्षणिक कर्जही फिटले नाही आणि एमडी होण्याचे तिचे स्वप्नही अधुरेच राहिले, अशी खंत तिच्या नातलगांनी व्यक्त केली. फलटणमध्ये आलेले अनुभवही अतिशय विचित्र होते, समाजात माणुसकी शिल्लक राहिली नाही, अशी भावनाही नातलगांनी व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील कोठरबन येथील तरुण महिला डॉक्टरने दोन दिवसांपूर्वी फलटण येथे एका हॉटेलात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहून त्यात पोलीस अधिकारी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांनी आपला शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याचे म्हटले होते. सातार्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधिकारी गोपाल बदने याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्याला तडकाफडकी निलंबित केले. आज पुण्यातून प्रशांत बनकर यालाही अटक करण्यात आली.
तरुणीच्या नातलगांना फलटणमध्ये असहकार्य
महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे कळताच तिचे नातलग फलटणमध्ये दाखल झाले. मात्र तिथे त्यांना कुणीही मदत केली नाही. रुग्णालयातील कर्मचार्यांनी तर असहकारच पुकारला होता. रुग्णवाहिकाही वेळेवर मिळाली नाही. हे सर्व जण दडपणाखाली वावरत होते, असे तिच्या नातलगांनी सांगितले.
सगळे स्वप्न अधुरे राहिले…
महिला डॉक्टरच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने काकांनी तिला शिक्षणासाठी बीडमध्ये आणले. एमबीबीएसला नंबर लागल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तीन लाख रुपये शैक्षणिक कर्ज काढले. हे कर्ज अजून फिटायचे आहे. तिला पुढे ईएनटी किंवा मेडिसीनमध्ये एमडी करायचे होते, पण हे स्वप्नही अधुरेच राहिले. आपल्याला होणार्या त्रासाबद्दल तिने काकांना सांगितले होते. परंतु तिच्या त्रासाची व्याप्ती यापेक्षा मोठी होती हे आम्हाला फलटणला गेल्यावर कळले, असे तिचे नातलग म्हणाले.

Comments are closed.