दादरजवळ लोकलवर दगड फेकल्याने महिलेचा डोळा फुटला!
मध्य रेल्वे मार्गावर दादर स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीने लोकल ट्रेनवर दगड फेकल्यामुळे महिलेचा डोळा फुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचून बराचवेळ रक्ताची धार लागली. तिला दादर स्थानकात उतरवण्यात आले आणि तातडीच्या उपचारासाठी पालिकेच्या शीव रुग्णालयात नेण्यात आले. गौरी नार्वेकर (50) असे जखमी महिलेचे नाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सायंकाळी 7.14ची बदलापूर जलद लोकल मार्गस्थ झाली होती. ही गाडी दादर स्थानकात पोहोचत असतानाच लोकलवर डाव्या बाजूने अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. यावेळी लोकलच्या गेटवर उभ्या असलेल्या गौरी नार्वेकर यांच्या डोळ्याला दगड लागून रक्ताच्या धारा लागल्या. त्याच डब्यात असलेल्या महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी जखमी गौरी यांना दादर स्थानकात उतरवले आणि जीआरपीची मदत मिळवून दिली. जीआरपीच्या जवानांनी गौरी यांना तातडीने प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले आणि पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात हलवले. दगड फेकण्याचे प्रकार रोखण्यासाठी रुळांवर ठराविक अंतरावर सीसीटीव्ही पॅमेरे लावावेत, अशी मागणी वंदना सोनावणे यांनी केली आहे.
Comments are closed.