वांझोळेमध्ये दिवसाढवळ्या वृद्ध महिलेला लुटले; महिलेच्या गळ्यातील लाखाचे मंगळसूत्र घेऊन भामट्याने केला पोबारा
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे बुद्रुक गवळीवाडी येथे खळबळजनक घटना घडली. एका भामट्याने अत्यंत चलाखीने आणि फिल्मी स्टाईलने ६७ वर्षीय वृद्ध महिलेला दिवसाढवळ्या लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीचे सोंग दाखवून, गोड बोलून आणि विश्वास संपादन करून शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंबेळे धावडेवाडी मार्गालगत हा थरार घडला. सौ. सरीता पांडुरंग वाजे (वय ६७, रा. वांझोळे बुद्रुक, गवळीवाडी) या आपल्या म्हशी चरवत असताना शेतातील चारा काढण्याच्या अत्यंत प्रामाणिक कामात व्यस्त होत्या. सकाळची वेळ आणि आजूबाजूला फारशी वर्दळ नसलेली निर्मनुष्य परिस्थिती असल्याचा नेमका फायदा घेत एक अनोळखी इसम त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला. अत्यंत धूर्तपणे त्याने महिलेकडे विळा मागितला आणि भेंडीचे दोर काढायचे असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
वृद्ध महिलेनेही विश्वासापोटी त्याला विळा हातात दिला. त्यानंतर तो इसम भेंडीचे दोर काढण्याचे काम करू लागला. जशी योग्य संधी मिळाली, तसा त्याने थेट महिलेच्या गळ्यातील सोन्यावर झडप घातली, तब्बल एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि काही अंतरावर उभी केलेल्या दुचाकीवर स्वार होऊन वारा वेगाने धूम ठोकली. काही कळण्याच्या आतच चोरटा घटनास्थळावरून गायब झाल्यामुळे हतबल झालेल्या त्या आजीबाईंना मोठा मानसिक धक्का बसला. याप्रकरणी मिळालेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देवरुख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम ए. पंदेरे करत आहेत.
Comments are closed.