तृणमूलकडून महिलांचा विश्वासघात : पंतप्रधान मोदी
विधानसभा निवडणुकीत मिळणार शिक्षा : पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येताच महिला सुरक्षेला प्राधान्य
वृत्तसंस्था/ बांकुडा
संसदेत 131 वी घटनादुरुस्ती विधेयक 2026 संमत करण्यापासून रोखून तृणमूल काँग्रेसने महिलांसोबत विश्वासघातक केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महिलाच तृणमूल काँग्रेसला शिक्षा करतील. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूलने काँग्रेससोबत मिळून संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा उद्देश असलेल्या विधेयकांना रोखले आहे, कारण तृणमूल काँग्रेस हा महिला सशक्तीकरणाच्या विरोधात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या बांकुडा जिल्ह्यातील विष्णुपूर येथील जाहीर सभेत केला.
विकसित भारताच्या निर्मितीत मुलींची भूमिका वाढणे आवश्यक आहे आणि राजकारणात त्यांची भागीदारीही मजबूत असायला हवी. परंतु तृणमूल काँग्रेस महिलांच्या राजकीय भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल नाही. एकीकडे भाजप महिलांच्या अधिकारांना मजबूत करण्यासाठी आग्रही असताना दुसरीकडे तृणमूलने या दिशेने सहकार्य केले नसल्याचा दावा मोदींनी केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देश आणि विदेशात सन्मान होतो, परंतु तृणमूल काँग्रेस त्यांच्या सन्मानावर प्रश्न उपस्थित करतो. राष्ट्रपती बंगाल दौऱ्यावर असताना जो प्रकार घडला तो पूर्ण देशाने पाहिला असल्याचे म्हणत मोदींनी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
मातृ शक्ति भरवसा कार्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या अनेक जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख करत ‘मातृ शक्ति भरवसा कार्ड’द्वारे बंगालच्या प्रत्येक भगिनीला वर्षात 36 हजार रुपये दिले जाणार असल्याचा विश्वास दिला. राज्यात भाजप सत्तेवर आल्यास गरोदर महिलांना 21 हजार रुपयांची थेट मदत करण्यात येईल. तर अपत्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारकडून देखील 5 हजार रुपयांचे सहाय्य केले जाणार असल्याचे सांगत मोदींनी महिला सशक्तीकरणाचा रोडमॅप समोर ठेवला आहे.
आयुष्मान भारत लागू करणार
मुलींच्या शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मोदींनी यावेळी दिले. बंगालच्या जनतेला आता स्वत:च्या अन्नधान्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भाजप सत्तेवर येताच सर्वांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे आणि ते कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. याचबरोबर डोक्यावर पक्के छताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महिलांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे सहाय्य करण्यात येणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. आरोग्य सेवांचा उल्लेख मोदीनी आयुष्मान भारत योजना लागू होताच प्रत्येक महिलेला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. वर्तमान तृणमूल सरकारने आयुष्मान भारत ही योजना राज्यात लागू केलेली नाही.
29 एप्रिलपूर्वी आत्मसमर्पण करा
तृणमूल काँग्रेसचा भयकाळ आता संपणार आहे, तर भाजपच्या भरवशाचा काळ येणार आहे. 4 मे रोजी निकाल काय लागणार याची झलक तृणमूलच्या मोठ्या नेत्यांच्या भाषणांमध्ये दिसून येतेय. कोलकात्यात तृणमूलच्या मोठ्या नेत्यांच्या धमक्या, त्यांची गुंडगिरीची भाषा, त्यांचे रडगाणे हे 4 मेपूर्वीचे एक्झिट पोल आहे. जे आतापर्यंत बंगालच्या लोकांना भयभीत करत होते, ते आता स्वत:च्या बंगालच्या जनतेच्या गर्जनेला घाबरून गेले आहेत. ‘अब नहीं सहेंगे, हटाकर रहेंगे निर्मम सरकार’ असे बंगालची जनता म्हणत आहे. तृणमूलचे सर्व गुंड, सिंडिकेट, भ्रष्टांना मी अखेरची संधी देत आहे. 29 एप्रिलपूर्वी स्वत:च्या पोलीस स्थानकात जात आत्मसमर्पण करा, कारण 4 मेनंतर कुणालाच वाचता येणार नाही असा इशारा मोदींनी दिला आहे.
तृणमूल काँग्रेस महिलाविरोधी आहे
-संसदेत तृणमूलने महिलांसोबत कशाप्रकारे विश्वासघात केला हे आम्ही पाहिले आहे. तृणमूलने काँग्रेससोबत मिळून या विधेयकाला रोखण्याचा कट रचला.
-भाजपची ओळख महिला सशक्तीकरण, त्याची सुरक्षा आणि सन्मानाशी जोडलेली आहे. याचमुळे देशभरातील महिला भाजपला आशीर्वाद देतात.
-विकसित भारताच्या निर्मिती महिलांची भूमिका वाढावी आणि अधिकाधिक महिलांनी राजकारणात यावे अशी आमच्या पक्षाची तीव्र इच्छा आहे.
-तृणमूल काँग्रेसने राज्याच्या भगिनी आणि मुलींसोबत विश्वासघात केला असल्याचे पश्चिम बंगालने पुन्हा एकदा पाहिले आहे.
-तृणमूल काँग्रेसचा महिला आरक्षण अन् महिला सशक्तीकरणाला विरोध आहे, राज्याच्या महिला मतदारच आता या पक्षाला चोख प्रत्युत्तर देतील.
Comments are closed.