सोशल मीडियावरील ओळखीतून खंडणी उकळून महिला पसार

सोशल मीडियावर झालेली ओळख मिठाईविक्रेत्याला महागात पडली असून, महिलेने मिठाईविक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा मोहित कदम (वय 30, रा. सांगली) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिठाईविक्रेत्याला धमकावून त्याच्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपी महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 45 वर्षीय मिठाईविक्रेता लष्कर भागात राहायला आहे. त्यांचे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्रीचे दुकान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिठाईविक्रेत्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. 25 सप्टेंबरला आरोपी लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्री दुकानात आली. मिठाईविक्रेत्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन दुकानाच्या गल्ल्यातील 500 रुपये आणि मिठाईचे बॉक्स घेऊन गेली. त्यानंतर महिला पुन्हा विक्रेत्याला भेटण्यासाठी आली.
तिने कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी दिली तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन 70 हजार रुपये घेतले. 70 हजार रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा धमकावून 2 लाख रुपये मागितले. तेव्हा मिठाईविक्रेत्याने तिला दुकानात बोलाविले. दुकानात दोन लाख रुपये देतो, असे सांगितले. तेव्हा तिने दुकानात येण्यास नकार दिला. ऑनलाइन पद्धतीने दोन लाख पाठविण्यास सांगितले. विक्रेत्याने ऑनलाइन 25 हजार पाठविले. धमकीमुळे घाबरलेल्या विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.
Comments are closed.