टीम इंडियाच्या नव्या टी20 मालिकेची घोषणा, 5 सामन्यांसाठी या देशाचा करणार दौरा

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून, दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रिका (CSA) ने अधिकृतपणे या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ही मालिका आगामी ICC महिला टी20 वर्ल्ड कप 2026च्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

CSA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप फायनलिस्ट दक्षिण अफ्रिका महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यातील ही टी20 मालिका 17 एप्रिलपासून 27 एप्रिलदरम्यान खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सामने डर्बन, जोहान्सबर्ग आणि बेनोनी या तीन शहरांमध्ये रंगणार आहेत.

या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा थरार डर्बनच्या किंग्समीड स्टेडियममध्ये होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने 17 आणि 19 एप्रिल रोजी किंग्समीड क्रिकेट ग्राउंडवर खेळवले जातील. त्यानंतर तिसरा आणि चौथा टी20 सामना जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियममध्ये अनुक्रमे 22 आणि 25 एप्रिल रोजी होणार आहे. मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना 27 एप्रिल रोजी बेनोनीच्या विलोमूर पार्क येथे खेळवला जाईल.

ही मालिका दक्षिण अफ्रिकन महिला संघासाठी ICC महिला टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीची अखेरची अधिकृत मालिका असणार आहे. हा वर्ल्ड कप 12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार असून, दक्षिण अफ्रिकेला ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, भारत आणि क्वालिफायरमधून आलेल्या दोन संघांसह स्थान देण्यात आले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

17 एप्रिल: पहिला टी२० सामना, किंग्जमीड क्रिकेट ग्राउंड (डर्बन)
19 एप्रिल: दुसरा टी२० सामना, किंग्जमीड क्रिकेट ग्राउंड (डर्बन)
22 एप्रिल: तिसरा टी२० सामना, वँडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग)
25 एप्रिल: चौथा टी२० सामना, वँडरर्स स्टेडियम (जोहान्सबर्ग)
27 एप्रिल : पाचवा टी२० सामना, विलोमूर पार्क क्रिकेट स्टेडियम (बेनोनी)

Comments are closed.