आता महिलांचीही मुंबई लीग मुंबईच्या महिला क्रिकेटला लाभणार नवे पंख

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रिकेटच्या जगतात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेने आता मुंबई लीगच्या चौथ्या हंगामासोबतच पहिल्या टी-20 मुंबई महिला लीगची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबईच्या महिला क्रिकेटला नवे पंख लाभले आहेत. हिंदुस्थानचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते दोन्ही स्पर्धांच्या चषकांचे अनावरण करण्यात आले.

2018 पासून सुरू झालेली टी-20 मुंबई लीग अनेक तरुणांना आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचवणारे व्यासपीठ ठरली आहे. आता महिला लीगच्या माध्यमातून मुंबईच्या मुलींनाही क्रिकेटच्या मोठय़ा मंचावर झळकण्याची संधी मिळणार आहे. मुंबई क्रिकेटला उंची देणाऱया या लीगबद्दल रोहित शर्मा म्हणाला, टी-20 मुंबई लीगने अनेक तरुणांना मोठे व्यासपीठ दिले आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू आयपीएल आणि राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचले. आता महिलांसाठी स्वतंत्र लीग सुरू होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

महिला क्रिकेटपटू सायली सातघरे हिनेही या लीगचे मनापासून स्वागत केले. मुंबई ही क्रिकेटचा श्वास असलेली नगरी आहे. महिलांसाठी स्वतंत्र लीग सुरू होणे म्हणजे अनेक तरुणींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळेल.

एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही ही लीग झपाटय़ाने वाढत असलेल्या महिला क्रिकेटसाठी अत्यंत गरजेची असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी आम्ही ही लीग सुरू करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

पहिल्या टी-20 मुंबई महिला लीगमध्ये तीन संघ सहभागी होणार असून पीआरएस इफ्राप्रोजेक्ट्स, रोडवे सोल्युशन्स इंडिया आणि वर्ल्ड स्टार स्पार्ंटग या कंपन्या त्यांचे संचालन करणार आहेत. या सोहळ्याला एमसीएच्या सर्व पदाधिकाऱयांसह राजकीय आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Comments are closed.