कबड्डीतही महिला जगज्जेतेपदाच्या उंबरठय़ावर, महिला कबड्डी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीवर प्रथमच चिनी आक्रमण

तीन आठवडय़ांपूर्वी हिंदुस्थानच्या रणरागिणींनी क्रिकेटचे जग जिंकलं होतं तर आता तोच इतिहास रचण्यासाठी महिला कबड्डीपटूही सज्ज झाल्या आहेत. इराणचा पाडाव करून हिंदुस्थानी संघाने सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे. आता त्यांना सलग दुसरे जगज्जेतेपद जिंकण्यासाठी अपराजित चिनी तैपेईचे आक्रमण उधळून लावावे लागणार आहे. ही लढत सोमवारी दुपारी 4 वाजता सुरू होईल.
महिला कबड्डीच्या इतिहासात प्रथमच जेतेपदाची लढत इराणशिवाय खेळली जाणार आहे. कारण इराणशी हिंदुस्थानची गाठ उपांत्य फेरीतच पडली आणि हिंदुस्थानने त्यांचा 33-21 असा सहज पराभव केला. मध्यंतरापर्यंत इराणने 15-11 अशी चांगली लढत दिली होती. मात्र दुसऱ्या डावात संजू देवीने केलेल्या सुस्साट खेळाने हिंदुस्थानची आघाडी 27-17 अशी वाढवत संघाचा विजय निश्चित केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेशला आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्याचा जराही लाभ उठवता आला नाही. हा सामना मध्यंतरापर्यंत बांगलादेशने 8-9 असा चुरशीचा ठेवला होता. मात्र उत्तरार्धात चिनी तैपेईने आणखी जोरदार हल्ले चढवत आपली 25-18 आघाडी वाढवली आणि प्रथमच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह तैपईने आपल्या विजयाचा षटकार ठोकला. हिंदुस्थाननेही सलग सहा सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे सोमवारी कोणता संघ अपराजित राहत जगज्जेतेपद पटकावतो याकडे अवघ्या कबड्डी विश्वाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.