WORLD CUP 2025: भारताचा वर्ल्ड कपमधील सर्वोच्च स्कोअर व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये रविवारी पार पडलेल्या थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवत इतिहास रचला. भारताने दिलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार एलिसा हीली हिच्या तुफानी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहा चेंडू राखून जिंकला. हीलीने 107 चेंडूंमध्ये 147 धावा करत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला. तिच्या खेळीला फोएबे लिचफिल्ड (40), एशले गार्डनर (45) आणि एलिस पेरी (नाबाद 47) यांची उत्तम साथ लाभली. याआधी 2022 मध्ये भारताविरुद्ध 278 धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठ्या रेकॉर्डचा मानही ऑस्ट्रेलियाकडेच होता.

भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 48.5 षटकांत 330 धावांचा डाव रचला. स्मृती मंधानाने 66 चेंडूंमध्ये 80 धावांची खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले. प्रतिका रावलने 75, तर हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांनीही पण उपयुक्त योगदान दिले. मात्र भारताने शेवटच्या सहा गडी केवळ 36 धावांत गमावले, ज्याचा फटका त्यांना शेवटी बसला. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅनाबेल सदरलँडने पाच गडी बाद करत भारतीय डावाला धक्का दिला, तर सोफी मोलिन्यूक्सने तीन विकेट्स घेतल्या.

भारताच्या गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रयत्न केले, पण हीलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा डाव मजबूत होता. शेवटच्या दोन षटकांत 13 धावांची गरज असताना एलिस पेरी आणि किम गार्थ यांनी स्नेह राणाच्या ओव्हरमध्ये चौकार, सिंगल्स आणि अखेरच्या षटकात पेरीने षटकार ठोकत सामना ऑस्ट्रेलियाच्या खिशात टाकला.

या पराभवानंतर भारताची सेमीफायनलमधील वाटचाल कठीण झाली आहे. उर्वरित इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे तिन्ही सामने जिंकणे आणि इतर संघांचे निकाल भारताच्या बाजूने लागणे गरजेचे आहे.

Comments are closed.