विरार लोकल आणखी फास्ट, कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या ट्रकचे काम पूर्ण

\विरार फास्ट लोकल यापुढे खऱ्या अर्थाने जलदगतीने धावू शकणार आहे. मेल-एक्सप्रेस गाडय़ांमुळे बोरिवली स्थानकाजवळ विरार लोकलची रखडपट्टी व्हायची. आता कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विरार लोकलच्या रखडपट्टीची समस्या दूर झाली आहे. मुंबई सेंट्रलपासून बोरिवलीपर्यंत मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा न बनता स्वतंत्रपणे धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेने मागील महिनाभरात कांदिवली व बोरिवली दरम्यान 3,210 किलोमीटर लांबीच्या सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले होते. नियमित ब्लॉक घेत हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर मेल-एक्सप्रेसचे प्रमाण वाढले आहे. त्याचा विरार आणि डहाणूकडे जाणाऱ्या लोकलसेवेवर परिणाम होत आहे. अप-डाऊन मार्गावरील विरार फास्ट लोकल मेल-एक्सप्रेसच्या अडथळ्यामुळे बोरिवली स्थानकाजवळ रखडत होत्या. ऐन पीक अवर्सला याचा मोठा मनस्ताप नोकरदारांना सहन करावा लागत असे. याच पार्श्वभूमीवर कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला गती देण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम परिमंडळचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ई. श्रीनिवास व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहाव्या मार्गिकेची सविस्तर तपासणी केली. त्यानंतर स्पीड चाचण्या घेण्यात आल्या आणि सहावी मार्गिका नियमित रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे मेल-एक्सप्रेसचा लोकल सेवेच्या वेळापत्रकात येणारा अडथळा दूर होणार आहे. बोरिवलीपुढे विरार, डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

n कांदिवली-बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम हे वांद्रे टर्मिनस ते बोरिवलीपर्यंतच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा भाग होते. यापूर्वी खार ते गोरेगाव दरम्यान नोव्हेंबर 2023मध्ये आणि गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ऑक्टोबर 2024मध्ये सहावी मार्गिका कार्यान्वित केली होती. त्यानंतर मागील 30 दिवसांत कांदिवली-बोरिवली दरम्यान युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात आले.

लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार

सहाव्या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास वेगवान बनणार आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक अधिक प्रभावीपणे चालवण्यात येईल. प्रवाशांची गर्दी कमी होईल, गाडय़ा वेळेवर धावतील. अतिरिक्त मार्गिकेमुळे ब्लॉक व गर्दीच्या वेळेत ऑपरेशनल कार्यक्षमता वाढेल. याचा लाखो प्रवाशांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

Comments are closed.