डॉलरचा ‘गेम’ होणार! जगातील अनेक देशांकडून डॉलरचा साठा कमी करण्यास सुरुवात
सध्या डॉलर मजबूत झाल्याने त्याचा परिणाम जगातिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. तसेच डॉलर मजबूत झाल्याने सोन्या-चांदीचे दर घसरत आहे. तसेच अनेक देशांच्या चलनाचे डॉलरपुढे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश डॉलरला पर्याय शेधण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे लवकरच डॉलरचा गेम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डॉलरसाठी वाईट दिवस सुरू होणार आहेत का? डॉलर आता जगातील प्रमुख चलन राहणार नाही का, की जगाने डॉलरला पर्याय शोधला आहे? याची चर्चा जगभरात नेहमी होत असते. आता एका अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एका सर्वेक्षणाचा हवाला देत रॉयटर्सच्या एका अहवालात म्हटले आहे की, जग आता डॉलरचा साठा कमी करण्याची तयारी करत आहे. जगात असे पहिल्यांदाच घडत आहे. तसेच झाल्यास भविष्यात डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे.
हे सर्वेक्षण ऑफिशियल मॉनेटरी अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स फोरम (OMFIF) द्वारे करण्यात आले. या सर्वेक्षणात म्हटले आहे की, पहिल्यांदाच जगभरातील मध्यवर्ती बँका पुढील १० वर्षांत त्यांच्या परकीय चलन साठ्यात (फॉरेक्स रिझर्व्ह) अमेरिकन डॉलरचा वाटा वाढवण्याऐवजी तो कमी करण्याची योजना आखत आहेत. जगाला आपला फॉरेक्स रिझर्व्ह पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवायचा आहे. त्यामुळे बँकांनी हा निर्णय घेतला आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका आता त्यांच्याकडील डॉलरचा साठा कमी करण्याचा विचार करत आहेत. त्याऐवजी, काही बँका त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इतर देशांची चलने ठेवत आहेत.
डॉलर हे जगातील सर्वात स्थिर चलन मानले जाते आणि जगभरातील देश एकमेकांशी डॉलरमध्ये व्यापार करतात. तेलाची आयात असो किंवा अन्नधान्याची निर्यात, व्यवहार नेहमीच डॉलरमध्ये करण्यात येतात. मात्र, आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अनेक देशांनी स्थानिक चलनांमध्ये आयात आणि निर्यात करण्यास सुरुवात केली आहे आणि ते अमेरिकेच्या दबावाच्या राजकारणामुळे नाराज असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, बहुतेक देश पुढील १० वर्षांत त्यांच्याकडील डॉलरचा साठा कमी करण्याची योजना आखत आहेत.
सर्वेक्षणानुसार, मध्यवर्ती बँकांना डॉलरमुळे तीन मोठे धोके दिसत आहेत. सर्वात मोठा धोका म्हणजे अमेरिकेतील राजकीय अनिश्चितता, त्यामुळे डॉलरच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरे म्हणजे, अनेक देशांसोबतच्या अमेरिकेच्या भू-राजकीय तणावामुळे डॉलरमध्ये लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. विशेषतः इराण युद्धादरम्यान डॉलरमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली आहे. तिसरे प्रमुख कारण म्हणजे जागतिक वित्तीय प्रणालीची बहुध्रुवीयता, म्हणजेच बहुतेक देश आता केवळ डॉलरमध्येच नव्हे, तर विविध चलनांमध्ये एकमेकांशी व्यापार करत आहेत. याचा अर्थ असा की, जगभरातील देशांना आता केवळ डॉलरवर अवलंबून राहायचे नाही.
सध्या, डॉलरला कोणताही स्पष्ट पर्याय दिसत नाही, परंतु जर हीच परिस्थिती राहिली, तर जग लवकरच डॉलरपासून दूर जाऊन दुसऱ्या चलनाकडे वळेल. सर्वेक्षणात असे आढळून आले की, डॉलरसाठी सर्वाधिक पसंतीचे पर्याय म्हणजे सोने, युरो, ब्रिटिश पाउंड, चीनी युआन, नॉर्वेजियन क्रोन आणि न्यूझीलंड डॉलर. तथापि, सर्वेक्षणात असेही नमूद केले आहे की युरो आणि युआनच्या स्वतःच्या मर्यादा आहेत, ज्यामुळे ते डॉलरचा संपूर्ण पर्याय बनू शकत नाहीत.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, या सर्वेक्षणापूर्वी, दुसऱ्या एका सर्वेक्षणात असे सूचित झाले होते की विक्रमी संख्येने मध्यवर्ती बँका आपला सोन्याचा साठा वाढवण्याची योजना आखत आहेत. अनेक देशांसाठी, भू-राजकीय जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी आणि राखीव निधीमध्ये विविधता आणण्यासाठी सोने आता एक महत्त्वाचे साधन बनत आहे.
अहवालात म्हटले आहे की, डॉलरचे जागतिक वर्चस्व नाहीसे होईल असे अद्याप दिसत नाही, कारण ते जगातील सर्वात मोठे राखीव चलन आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याची भूमिका मजबूत आहे. हा बदल अचानक नसून हळूहळू होणारा आहे.
जर डॉलरवरील अवलंबित्व कमी झाले, तर हिंदुस्थानसारखे देश आपल्या चलनांना बळकटी देऊ शकतात आणि जगासोबत रुपयातील व्यापार वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, ते त्यांच्या परकीय चलन साठ्यात सोने आणि इतर चलनांचा वाटा वाढवू शकतात. मात्र, हे अचानक घडणार नाही. डॉलरचे वर्चस्व हळूहळू कमी होऊ शकते.
Comments are closed.