जगज्जेत्या आयुष म्हात्रेचा आज सन्मान सोहळा, विरारच्या सुपुत्राला वसई-विरार पालिकेचा सलाम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युवा वर्ल्ड कप जिंकून देशाचा झेंडा उंचावणारा आणि वसई-विरारचे नाव जगभर गाजवणारा तरुण कर्णधार आयुष म्हात्रेचा वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून भव्य सत्कार करण्यात येणार आहे. आपल्या धडाकेबाज नेतृत्व आणि दमदार कामगिरीने हिंदुस्थानी संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱया या स्थानिक सुपुत्राचा गौरव करण्यासाठी पालिकेने खास सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवारी 13 मार्चला दुपारी 3 वाजता हा सन्मान सोहळा मुख्यालयात पार पडणार आहे.

विरार पश्चिमेकडील नाळे-पढई गावचा सुपुत्र असलेल्या आयुषने युवा वर्ल्ड कपमध्ये (19 वर्षांखालील) स्पर्धेत हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. संघाच्या प्रत्येक विजयामागे त्याची रणनीती, शांत नेतृत्व आणि मैदानावरील जिद्द स्पष्ट दिसून आली. त्यामुळे केवळ देशालाच नव्हे, तर वसई-विरार शहरालाही त्याच्या यशाचा प्रचंड अभिमान वाटत आहे. आयुषच्या या ऐतिहासिक कर्तृत्वाची दखल घेत 20 फेब्रुवारीला झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी 3 वाजता वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात आयुष म्हात्रेचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महापौर आजीव पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार होणार असून शहरातील क्रीडाप्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

Comments are closed.