वर्ल्ड चॅम्पियन कुलदीप यादव अडकणार लग्नबंधनात; बालमैत्रिणीसोबत ‘या’ तारखेला मसुरीमध्ये पार पडणार विवाहसोहळा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) देखील या भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. आता विश्वविजेता बनल्यानंतर कुलदीप यादव लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तो त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार असून त्याच्या लग्नाची तारीख आता समोर आली आहे.
कुलदीप यादव 14 मार्च रोजी मसुरी येथील एका रिसॉर्टमध्ये त्याची बालमैत्रीण वंशिका हिच्याशी विवाह करणार आहे. लग्नानंतर 17 मार्च रोजी लखनऊमध्ये रिसेप्शन (स्वागत समारंभ) पार पडेल. कुलदीप आणि वंशिका यांचा साखरपुडा गेल्या वर्षीच झाला होता. वंशिका एलआयसी (LIC) मध्ये नोकरी करते. कुलदीपचे वडील राम सिंग यादव यांनी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे.
रिपोर्ट्सनुसार, कुलदीपने नोव्हेंबर 2025 मध्ये होणारे आपले लग्न टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तयारीमुळे पुढे ढकलले होते. आता वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर तो नवरदेव बनण्यासाठी सज्ज आहे. लग्नानंतर कुलदीप आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल.
कुलदीप यादवने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने अतिशय अचूक गोलंदाजी करत 3 षटकांत फक्त 14 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 61 धावांनी विजय मिळवला होता. कुलदीपच्या क्रिकेट करिअरचा विचार केल्यास, त्याने भारतासाठी 17 कसोटी सामन्यांत 76 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 120 वनडे सामन्यांत त्याने 194 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी खेळलेल्या 54 टी-20 सामन्यांत कुलदीपने आतापर्यंत 95 फलंदाजांना बाद केले आहे.
Comments are closed.