वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा विस्फोट! सर्वात वेगवान शतक, इंग्लंडच्या गोलंदाजांची वाट लावली!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड: आयसीसी महिला विश्वचषक 2025चा 23वा सामना 22 ऑक्टोबर रोजी इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 विकेट्सने पराभव करत शानदार विजय नोंदवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू अ‍ॅशले गार्डनरने इतिहास रचला. तिने महिला एकदिवसीय विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आणि तिच्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

गार्डनरने फक्त 69 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले आणि 104 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये 16 चौकारांचा समावेश होता. यापूर्वी, हा विक्रम वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटिनच्या नावावर होता, जिने 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 71 चेंडूत शतक झळकावले होते. गार्डनरने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ही कामगिरी केली. सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना गार्डनरने तीन शतके झळकावली आहेत.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 244 धावा केल्या. सलामीवीर टॅमी ब्यूमोंटने 105 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांसह 78 धावा केल्या. तिच्या डावात एक षटकाराचा समावेश होता, तर अ‍ॅलिस कॅप्सीने 38 आणि चार्लोट डीनने 26 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, त्यांनी 68 धावांत चार गडी गमावले. तथापि, नंतर अ‍ॅशले गार्डनर आणि अ‍ॅनाबेल सुदरलँडने जबाबदारी सांभाळली. त्यांनी मिळून 180 धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला 40.3 षटकांत लक्ष्य गाठून दिले.

गार्डनरने विजयी चौकारांसह सामना संपवला, तर सदरलँड 98 धावांवर नाबाद राहिली. या जोडीने केवळ सामना जिंकला नाही तर इंग्लिश गोलंदाजांना पूर्णपणे निष्प्रभ केले. या विजयासह, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत पुन्हा एकदा पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलिया आता आपला शेवटचा लीग स्टेज सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. हा सामना 25 ऑक्टोबर रोजी इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे, जिथे ऑस्ट्रेलिया आपला विजयी सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Comments are closed.