योगेश कथूनियाला आणखी एक रौप्य

हिंदुस्थानचा पॅरा खेळाडू योगेश कथूनिया याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चमक दाखवत मंगळवारी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या एफ-56 गटातील थाळीफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या कामगिरीमुळे योगेशने सलग चौथ्यांदा जागतिक पॅरा स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हे त्याचे तिसरे रौप्यपदक ठरले. 28 वर्षीय कथूनियाने आपल्या दुसऱया प्रयत्नात 42.49 मीटर अंतर गाठून दुसरे स्थान पटकावले. ब्राझीलचा विश्वविक्रमवीर स्टार क्लॉडिने बाटिस्टाने 45.67 मीटर फेकीसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 2019 पासून बाटिस्टाचे हे सलग चौथे जागतिक विजेतेपद आहे. योगेशने याआधी 2023 आणि 2024 मधील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही रौप्य पटकावले होते. तसेच 2021 आणि 2024 च्या पॅरालिम्पिकमध्ये त्याने दोनदा रौप्यपदक जिंकले आहे. 2019 मध्ये त्याने कांस्यपदक मिळवले होते.
Comments are closed.