कसोटीत केवळ दुसऱ्यांदा, 6 गडी शून्यावर बाद, इंग्लंडच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद!

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने एक असं कारनामा केला आहे, जो आजवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुणीच केला नव्हता. भारताच्या 587 धावांच्या डोंगरासमोर इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावा केल्या आणि इतिहास रचला.

तुम्हाला प्रश्न पडेल की 407 धावा काढून कुठला इतिहास रचला? तर त्यामागचं कारण आहे की, इंग्लंडचे 6 फलंदाज ‘डक’ म्हणजे शून्यावर बाद झाले, तरीही त्यांनी 400 पेक्षा अधिक धावा केल्या. असं करणारा इंग्लंड पहिलाच संघ ठरला आहे.

या डावात इंग्लंडकडून दोन खेळाडूंनी सर्वाधिक योगदान दिलं. हॅरी ब्रूकने 158 धावा केल्या तर जेमी स्मिथने नाबाद 184 धावांची शानदार खेळी साकारली. दोघांनी मिळून 303 धावांची भागीदारी केली. उर्वरित फलंदाज मात्र केवळ 105 धावांपर्यंतच पोहोचू शकले.

याआधी बांगलादेशने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 6 खेळाडू ‘डक’वर बाद होऊनही 365 धावा केल्या होत्या. त्या डावात मुश्फिकुर रहीमने नाबाद 175 आणि लिटन दासने 141 धावांची खेळी केली होती.

फक्त कसोटी क्रिकेटच नव्हे, तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील ही कामगिरी विक्रमी ठरते. यापूर्वी छत्तीसगडने कर्नाटकाशिविरोधात 6 खेळाडू ‘डक’वर बाद होऊन 311 धावा केल्या होत्या.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात इंग्लंडसाठी अत्यंत खराब झाली होती. केवळ 84 धावांवर त्यांच्या पाच विकेट्स गेल्या होत्या. अनेकांना वाटलं होतं की भारत इंग्लंडला फॉलोऑन देऊ शकेल. मात्र ब्रूक आणि स्मिथने खेळाचे चित्रच पालटून टाकले. अखेरीस 387 धावांवर ब्रूक बाद झाला आणि इंग्लंडचा डाव 407 धावांवर आटोपला.

पहिल्या डावात भारताला 180 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 1 गडी गमावत 64 धावा केल्या असून एकूण आघाडी 244 धावांवर पोहोचली आहे.

आता भारताचा उद्देश चौथ्या दिवशी कमीत कमी अडीच सत्र फलंदाजी करून इंग्लंडपुढे 500+ धावांचं मोठं आव्हान ठेवण्याचा आहे.

Comments are closed.